एसएससी बोर्डाच्या गलथान कारभाराविरोधात भाजप आंदाेलन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:33 AM2021-07-26T04:33:34+5:302021-07-26T04:33:34+5:30
दहावीच्या परीक्षेच्या निकालावेळी सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकाल कळण्यासाठी चार ते आठ तास विलंब झाला. ...
दहावीच्या परीक्षेच्या निकालावेळी सर्व्हर क्रॅश झाला होता. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांना निकाल कळण्यासाठी चार ते आठ तास विलंब झाला. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांची निराशा झाली व त्यांच्या आनंदावर विरजण पडले. आता अकरावी परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेची नाव नोंदणी करण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ गेल्या आठवड्यापासून बंद आहे. तांत्रिक बिघाडाचे कारण सांगितले जात असले, तरी मंडळाचा गलथानपणाच यास कारणीभूत असून हा बिघाड दूर करण्यात होणाऱ्या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आले आहे.
बोर्डाच्या अकार्यक्षम, बेजबाबदार आणि गलथान कारभारामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. यावर गांभीर्याने विचार करून मंडळाने तांत्रिक बाबींची तातडीने पूर्तता करावी आणि संकेतस्थळ विद्यार्थ्यांना सुलभतेने उपलब्ध करून द्यावे, तसेच सीईटी परीक्षेच्या नोंदणीची मुदत वाढवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष नागदेवे यांनी दिला असल्याचे पक्षाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अनिल पाेहनकर यांनी कळविले आहे.
बाॅक्स
मराठी व हिंदी भाषेचा वापर हवा
सीईटी परीक्षेसाठी निश्चित केलेल्या विषयांमध्ये इंग्रजी, गणित, सामान्य विज्ञान आणि विज्ञान हे विषय आहेत. परंतु महाराष्ट्रात मराठी व हिंदी भाषा विषयांचा समावेश नाही. यामुळे मायबोली मराठीची आणि राष्ट्रभाषा हिंदीची गळचेपी होणार आहे. शिवाय या माध्यमांतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे सीईटी परीक्षेत इंग्रजी सोबत मराठी व हिंदी भाषांचा वैकल्पिक भाषा विषय म्हणून तातडीने समावेश करण्यात यावा, अशीही मागणी भाजपने केली आहे.