युवाशक्तीमुळे भाजपची मते वाढली

By Admin | Published: May 22, 2014 11:53 PM2014-05-22T23:53:14+5:302014-05-22T23:53:14+5:30

लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजप उमेदवाराला सर्वाधिक ६९ हजाराचे मताधिक्य गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मिळाले आहे.

BJP's votes increased due to youth power | युवाशक्तीमुळे भाजपची मते वाढली

युवाशक्तीमुळे भाजपची मते वाढली

googlenewsNext

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीत गडचिरोली-चिमूर मतदार संघात भाजप उमेदवाराला सर्वाधिक ६९ हजाराचे मताधिक्य गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मिळाले आहे. या मताधिक्यामागे युवाशक्ती आघाडीचे प्रमुख नेते न.प.चे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार यांची रणनिती कारणीभूत ठरली, असे दिसून येत आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांची उमेदवारी काँग्रेस पक्षाने कापली व त्यांच्या जागी चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक गडचिरोलीचे आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांना उमेदवारी बहाल करण्यात आली. या घटनेनंतर युवाशक्ती आघाडीचे जिल्ह्यासह चिमूर भागातील नेतेही जागृत झाले व त्यांनी या निवडणुकीत उमेदवार उभा न करता भाजपला पाठींबा देण्याबाबत युवाशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बंटी उर्फ किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर दबाव वाढविला. दरम्यान युवाशक्तीतील एका गटाने नागभिड येथील प्रा. योगेश गोन्नाडे यांची उमेदवारीही दाखल केली होती. परंतु काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांना कुठल्याही परिस्थितीत धडा शिकवायचा या ज्वरेने पेटलेल्या युवाशक्तीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गोन्नाडेंची उमेदवारी मागे घेऊन अशोक नेते यांच्या मागे संपूर्ण ताकद उभी करण्याचा निर्णय घेतला व स्वत: प्रा. राजेश कात्रटवार आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह नियोजनबध्द पध्दतीने कामाला लागलेत. एकीकडे भारतीय जनता पार्टी आपल्या उमेदवारासाठी झटत असताना युवाशक्तीचा मोठा फोर्स त्यांच्या ताकदीत मिळाला. त्यामुळे गडचिरोली-चिमूर मतदार संघात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचा आमदार असतानाही सर्वाधिक पानिपत याच मतदार संघात काँग्रेसचे झाले. गडचिरोली नगर परिषदेच्या क्षेत्रात ८५०० वर अधिक मताचे लीड भाजपला मिळाले. आमदार उसेंडींशी युवाशक्तीचे कोणतेही व्यक्तीगत हेवेदावे नव्हते. कधी उसेंडी नगर परिषदेच्या कारभारातही बोलले नाहीत. परंतु युवाशक्तीचा सर्व राग हा माजी राज्यमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर होता. त्याची जबर किंमत आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभा निवडणुकीत मोजावी लागली. त्यांच्या स्वत:च्या मतदार संघातही ते ६९ हजाराने मागे गेले. तसेच आरमोरी, चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रातही युवाशक्तीशी झालेल्या भाजप आघाडीचा प्रभाव जाणवला. डॉ. उसेंडी हे वडेट्टीवार यांच्या खेम्यातील उमेदवार नसते तर त्यांच्याविषयी कदाचित अशी परिस्थिती आली नसती, असे राजकीय जाणकारांचे विश्लेषण आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसने विद्यमान खासदार मारोतराव कोवासे यांना उमेदवारी दिली असती तर युवाशक्ती आघाडी भाजपच्या खेम्यात दाखलही झाली नसती. वरपांगी प्रचार करून कोवासेंच्या बाजुने झुकते माफ देण्याची भुमिका या संघटनेने घेतली असती. काँग्रेसचा पराभव जरी झाला असता तरी पराभवाच्या अंतराचे मताधिक्य मात्र लाखाच्या आत असते, असे जाणकार मानतात. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवाशक्ती आघाडीच्या रणनितीवर अनेक राजकीय पक्षांचे नजर आहे. भारतीय जनता पक्षाजवळ गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरीता सक्षम उमेदवार नाही. युवाशक्ती आघाडीने गडचिरोलीच्या नगराध्यक्षाचे नाव उमेदवारीसाठी समोर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर काँग्रेसचा वडेट्टीवार विरोधक गट पुन्हा एका जुन्या राजकीय नेत्यालाच मैदानात उतरविण्याच्या तयारीला आहे. ६९ हजाराने माघार असल्याने विद्यमान आमदारांना पुन्हा काँग्रेस पक्षाकडे तिकीट मागण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही, असा काँग्रेसच्या वडेट्टीवार विरोधक गटाचा दावा आहे. त्यामुळे या मतदार संघात नवा उमेदवार द्यावा, अशी आग्रही मागणी वडेट्टीवार विरोधक करीत आहे व त्यांनी अलिकडेच एक बैठकही घेतली, अशी सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येही विधानसभा निवडणुकीच्या तिकीटसाठी जबरदस्त रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. काँग्रेसची हायकमांड कुणाच्या पदरात तिकीट टाकते हे निवडणूक जाहीर झाल्याशिवाय कळणार नाही, हे मात्र निश्चित. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: BJP's votes increased due to youth power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.