गडचिरोली जिल्ह्यात भेंडाळा परिसरात फुलत आहे काळ्या तांदळाची शेती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 01:33 PM2020-09-12T13:33:29+5:302020-09-12T13:33:50+5:30
भेंडाळा परिसरात असलेल्या मार्कंडादेव येथील पंकज पांडे या शेतकऱ्यानी प्रायोगिक तत्त्वावर एका एकर मधे काळ्या धानाची शेती करण्यास सुरुवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: तांदूळ म्हटलं की पहिला आठवतो तो भात. भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो, त्याचा स्वादही घेतो. आपल्या परिसरात असे अनेक प्रकारचे तांदूळ उत्पादित केले जातात. परंतु भेंडाळा परिसरात असलेल्या मार्कंडादेव येथील पंकज पांडे या शेतकऱ्यानी प्रायोगिक तत्त्वावर एका एकर मधे काळ्या धानाची शेती करण्यास सुरुवात केली. हा धान आपल्या परिसरात नवीन आहे म्हणून या शेतकऱ्यानी या धानाची बिजाई माजी आमदार रामकृष्ण मडावी यांच्या वैरागड येथल्या शेतातून आणली. या शेताला चामोर्शी तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी आताच काही दिवसापूर्वी भेट दिली होती. या परिसरातल्या शेतकऱ्यांना हा कुतुहलाचा विषय बनत आहे.
मोठमोठ्या शहरामधे काळ्या तांदळाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. काबोर्हाइड्रेट युक्त असलेले हे काळे तांदूळ शुगर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. काळे तांदूळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील नियंत्रित करता येते. त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याकारणाने ते पचण्यास उपयुक्त असतात आणि सोबतच एंटीऑक्सीडेंट तत्त्व असल्याने ते डोळ्यांसाठी देखील उपयोगी ठरतात.
सामान्य तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ शिजायला फार वेळ लागतो. कोरोना विषाणूविरुध्द रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा काळा तांदूळ फायदेशीर ठरतो.
काळा तांदळापासून मिळणारे फायदे
आरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. या काळ्या तांदळामधील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. हृदयामधील धमन्यांमध्ये अर्थोस्क्लेरोसिस प्लेक फर्मेशनची संभावना कमी करते, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची संभावना कमी होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळे तांदूळ अतिशय फायदेशीर ठरतात.
या तांदळामध्ये असलेल्या फायबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते. काळ्या तांदळामध्ये असलेल्या एंथोसायनिन नावाच्या एंटीऑक्सीडेंटमुळे कार्डियोवेस्कुलर आणि कैंसरसारख्या आजारापासून आपले संरक्षण करते. काळ्या तांदळामधील एंटीऑक्सीडेंट तत्व हे त्वचा व डोळ्यांसोबत बुद्धीसाठी देखील फायदेशीर असते.