चहाच्या नफ्यातून गरिबांना ब्लँकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:51 AM2018-02-05T00:51:35+5:302018-02-05T00:52:24+5:30
आलापल्ली येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या रियाज कुरेशी नामक युवकाने चहाच्या नफ्यातून गोळा झालेल्या रकमेतून ब्लँकेट खरेदी करून या ब्लँकेटचे गोरगरीब नागरिकांना वितरण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या रियाज कुरेशी नामक युवकाने चहाच्या नफ्यातून गोळा झालेल्या रकमेतून ब्लँकेट खरेदी करून या ब्लँकेटचे गोरगरीब नागरिकांना वितरण केले.
रियाज कुरेशी या युवकाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी टी स्टॉलमध्ये एक बंद पेटी ठेवली होती. प्रत्येकी पाच रूपये कट चहा पैकी दोन रूपये या बंद पेटीत टाकात होता. तर उर्वरित तीन रूपये चहाचा खर्च म्हणून रियाज कुरेशी स्वत:कडे ठेवत होता. काही दिवसानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसमोर बंद पेटी फोडण्यात आली. बंद पेटीतून प्राप्त झालेल्या रकमेत आणखी त्याने स्वत:च्या कमलाईमधील काही पैसे टाकून तत्काळ १० ब्लँकेट खरेदी केले. अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयातील गोरगरीब नागरिकांना रियाजने सदर ब्लँकेट वितरित केले. यावेळी डॉ. संजय उमाटे, ज्येष्ठ पत्रकार ए. आर. खान, फिरोज शेख, प्रशांत ठेपाल, ग्रा. पं. सदस्य आशिष झाडे, इसरार शेख, संतोष येनगंटीवार, राकेश कुंदोजवार आदी उपस्थित होते. रियाज कुरेशीचे हे कार्य इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
नागरिकांचाही प्रतिसाद
रियाज कुरेशीने सामाजिक बांधिलकी जोपासत नफ्याचे दोन रूपये बंद पेटीत टाकण्याची अनोखी संकल्पना सुरू केली. रियाजच्या या संकल्पनेला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यात पैसा वापरला जात असल्याने नागरिकांनीही रियाज कुरेशीकडून चहा खरेदीला प्राधान्य दिले.