बारसेवाडा जंगलात भडकला वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:39 AM2019-03-28T00:39:54+5:302019-03-28T00:41:30+5:30
तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील बारसेवाडा जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागल्याने या जंगलातील मौल्यवान वनस्पती जळून खाक होण्याची शक्यता आहे. तसेच जंगलात असलेल्या वन्यजीवांनाही या आगीपासून धोका पोहोचू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्या, अशी मागणी होत आहे.
एटापल्ली तालुक्यात गौण वनोपज व मौल्यवान वनस्पतींची भरमार आहे. तालुका अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असल्याने या तालुक्याचा विकास करण्याकडे शासन, प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष राहिले आहे. तालुक्यातील जंगलात सागवान, येन, आंजन, बेहडा, तेंदू, मोहा, चारोळी यासह विविध प्रजातींची वनस्पती आहे. मागील काही दिवसांपासून मोहफूल संकलनाचे काम सुरू असल्याने अनेक नागरिक मोहाच्या झाडाखालील पालापाचोळा जाळतात. पालापाचोळा जाळल्यानंतर त्याचे हळूहळू मोठ्या आगीत रूपांतर होते. बुधवार २७ मार्चला भर दुपारी बारसेवाडाच्या जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागली होती. जंगलात सर्वत्र पालापाचोळा असल्याने ही आग सर्वदूर पसरल्याचे दिसून आली. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली असल्याने दुपारी तीव्र उन्हाच्या हवेचा झोका येत असल्याने परिसरात वणवा असल्यास अन्य ठिकाणी आग लागण्याची शक्यता अधिक असते. वन व वन्यजीवांची हानी रोखण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करून कार्यवाही करावी, अशी मागणी बारसेवाडा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.