कुरखेडात १०१ युवकांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:02 AM2017-12-14T00:02:36+5:302017-12-14T00:03:37+5:30
संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा कुरखेडाच्या वतीने सोमवारी संत निरंकारी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा कुरखेडाच्या वतीने सोमवारी संत निरंकारी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टचे गडचिरोली क्षेत्रीय संचालक हरीश निरंकारी, कुरखेडा मंडळाचे प्रमुख माधवदास निरंकारी, देसाईगंज चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रकाश कुकरेजा, मोहन मनुजा, पंढरी नाकाडे, माजी पं. स. सदस्य चांगदेव फाये आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना किसन नागदेवे म्हणाले, रक्त न मिळाल्याने अनेकांचे जीव जातात. समाजात अनेक नागरिक व युवक रक्तदान करण्यास सक्षम आहेत. मात्र रक्तदानाविषयी चुकीच्या समजूती व जनजागृतीचा अभाव असल्याने ते रक्तदान करण्यास तयार होत नाही. सक्षम असलेल्या प्रत्येक व्यक्तीने वर्षातून किमान एक ते दोनवेळा रक्तदान केल्यास रक्ताची कधीच कमतरता भासणार नाही. आज आपण सक्षम असलो तरी उद्या आपल्याला रक्ताची गरज भासू शकते. ही सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन रक्तदान करावे. त्याचबरोबर इतरही नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी जनजागृती करावी, गडचिरोली जिल्ह्यात रक्ताची सर्वाधिक गरज भासते. त्यामुळे रक्तदान करावे, असे आवाहन केले.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश बोरकर, रक्त संक्रमण अधिकारी सतीश तडकलावार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रशमी मोघरे, कल्पना भट, परिचारिका लोखंडे, ममीता कन्नाके, टिकेश्वरी करमकर, पेद्दीवार, बंडू गेडाम, रोशन सहारे यांनी सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक दिलीप निरंकारी, शिक्षक अजय पुस्तोडे व निरंकारी सेवा दलाच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
संत निरंकारी मंडळ सर्वात मोठा रक्तदाता
संत निरंकारी मंडळाच्या वतीने प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. दरवर्षी एक हजार पेक्षा अधिक बॉटल रक्त जिल्हा सामान्य रुग्णालय व इतर रुग्णालयांना उपलब्ध करून दिले जाते. काही दिवसांपूर्वीच जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यानंतर आता कुरखेडा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आला. संत निरंकारी मंडळाच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्याचबरोबर या त्यांच्या या समाजोपयोगी उपक्रमामुळे अनेकांना जीवदान मिळण्यास फार मोठी मदत झाली आहे. संत निरंकारी मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला रक्तदानासाठी प्रोत्साहित केले जाते. त्यामुळे रक्तदानास सक्षम असलेला कार्यकर्ता रक्तदान करतो. त्यामुळेच विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे शक्य होते.