१२५ रक्तदात्यांचे रक्तदान
By admin | Published: September 28, 2015 01:40 AM2015-09-28T01:40:11+5:302015-09-28T01:40:11+5:30
संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा गडचिरोली यांच्या वतीने रविवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचेही रक्तदान : संत निरंकारी मंडळाचा उपक्रम
गडचिरोली : संत निरंकारी मंडळ दिल्ली शाखा गडचिरोली यांच्या वतीने रविवारी जिल्हा सामान्य रूग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिरात १२५ पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी स्वत: रक्तदान करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ केला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत वाघरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, देसाईगंजचे संवर्ग विकास अधिकारी सुनिता म्हरस्कोल्हे डॉ. नारायण करेवार, संत निरंकारी मंडळाचे ब्रँच मुखीया गजानन तुंकलवार, डॉ. साळवे, नगर सेवक राजू जेठाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी बहुतांश नागरिकांमध्ये रक्तदान करण्याची क्षमता आहे. मात्र यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवा केल्याचे समाधान मिळत असल्याने प्रत्येक नागरिकाने रक्तदान केले पाहिजे. सामाजिक बांधिलकी मजबूत होत गेल्यास आव्हानांचा सामाना करणे सोपे जाते. संत निरंकारी मंडळ राबवित असलेले समाज उपयोगी कार्यक्रम निश्चितच कौतुकास पात्र आहेत. या मंडळापासून इतर मंडळे, स्वयंसेवी संस्था व धार्मिक संस्थांनी धडा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सकाळी ११ वाजता रक्तदानास सुरूवात झाली होती. रक्तदान करण्यासाठी सकाळपासूनच संत निरंकारी मंडळाचे शेकडो कार्यकर्ते रूग्णालयात दाखल झाले होते. सायंकाळपर्यंत रक्तदान सुरूच होते. विशेष म्हणजे या सामाजिक उपक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: रक्तदान करून रक्तदान शिबिराची सुरूवात केली. प्रास्ताविक हरिष निरंकारी, संचालन भास्कर मडावी तर आभार अशोक बोरकुटे यांनी मानले.
शिबिर यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळाचे सदस्य यांच्यासोबतच रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शैला मैदमवार, तंत्रज्ञ अनिल घोडमारे, विजय पत्तीवार, सुरेश येसेकर, सतिश तडकलवार, बिबुशचंद्र रामटेके, वाघाडे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)