देसाईगंज येथील शिबिरात ३१० रक्तदात्यांनी केले रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 11:35 PM2019-04-26T23:35:00+5:302019-04-26T23:35:25+5:30
संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन देसाईगंजच्या वतीने २६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३१० जणांनी रक्तदान केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून उपक्रमाची प्रशंसा केली.
संत निरंकारी मंडळातर्फे सद्गुरू गुरूबच्चनसिंह महाराज तथा सर्व हुतात्म्यांच्या स्मृतीपित्यर्थ २४ एप्रिल नंतर स्थानिक शाखेच्या सोयीनुसार रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. देसाईगंज शाखेच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन येथे रक्तदान शिबिर आयोजीत केले होते. संत निरंकारी मंडळाचे हे दहावे वर्ष आहे. संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्वाधिक रक्तदान केले जाते. मागील वर्षी ४३१ युनिट रक्त संकलित करण्यात आले होते.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी निरंकारी मंडळाचे देसाईगंज झोनचे प्रभारी किसन नागदेवे होते. प्रमुख अतिथी म्हणून संयोजक आसाराम निरंकारी, माधवदास निरंकारी, रामलाल माहनाली, हरीष निरंकारी, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, सदानंद कुथे, नरेश विठलानी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. आमदार कृष्णा गजबे, जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम यांनी रक्तदान शिबिराला भेट दिली. शिबिरात २६१ पुरूष व ४९ महिला अशा एकूण ३१० नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदान केले. रक्त संकलनासाठी डॉ. किशोर ताराम, डॉ.अंजली साखरे, डॉ.रिजवान शेख, डॉ. नागपासे, डॉ. नितेश नाकट, धानोरा येथील डॉ. सावसाकडे, कुरखेडा येथील डॉ. ठाकर, आरमोरी येथील डॉ. शेख, देसाईगंजचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुमरे, डॉ. इकबाल शेख, डॉ. रश्मी रामानी, डॉ.अंजली भुरले, डॉ. मृणाल नाकाडे, सतीश तडकलावार यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक नानाक कुकरेजा, संचालन लक्ष्मण रामानी तर आभार पुरूषोत्तम डेंगानी यांनी मानले. शिबिरासाठी रोषण नागदेवे, दीपक कुकरेजा, कोमल डोडानी, राजकुमारी डेंगानी यांनी सहकार्य केले.
गणेश फापट यांचे २६ व्या वेळी रक्तदान
देसाईगंज नगर परिषदेचे नगरसेवक गणेश जयकिशन फापट यांनी संत निरंकारी मंडळातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन रक्तदान केले. आजपर्यंत त्यांनी २६ वेळा रक्तदान केले आहे. फापट यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान केले आहे. रक्तदानाने एखाद्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे प्रत्येक सशक्त व्यक्तीने रक्तदान करावे, असे आवाहन फापट यांनी केले.