बोडी कामावरून मजूर परत पाठविले
By admin | Published: May 27, 2014 11:42 PM2014-05-27T23:42:52+5:302014-05-27T23:42:52+5:30
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही.
मानापूर/देलनवाडी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमार्फत किमान १00 दिवसांचे काम उपलब्ध करून देण्याचे धोरण आहे. या अंतर्गत अनेक ठिकाणी कामाची अंमलबजावणीच होतांना दिसत नाही. आरमोरी पंचायत समितीच्या महिला सदस्यांनी आपल्या शेतावरील बोडीवरील माती कामावरून मजूर परत पाठविल्याची घटना घडली. लोकप्रतिनिधींच्या या कार्यपद्धतीमुळे आपण कामापासून वंचित राहिल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. याबाबत माहिती अशी की, आरमोरी पंचायत समितीच्या सदस्य व पिसेवडधा येथील रहिवासी इंदिरा मोहुर्ले यांच्या स्वमालकीच्या बोडीवर मातीकाम करण्यासाठी ३ लाख रूपयाचा निधी मंजूर झाला. पंचायत समितीमधून पिसेवडधा ग्रामपंचायतीला कामाचे आदेशही मंजूर झाले. रोजगार सेवकाने यादीही प्रसिद्ध केली. २४ जून २0१४ रोजी मजुरांना या कामावर पाठविण्यात आले. प्रत्यक्ष बोडीवर कामासाठी पोहोचल्यावर पं. स. सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी मजुरांना काम करू देण्यास मज्जाव केला. त्यामुळे मजूर सतंप्त झाले. आपल्या तोंडचा रोजगार हिरावला, असा रोष त्यांनी व्यक्त केला. यावेळी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मजुरांची समजूत घालत हे प्रकरण निस्तारले. या प्रकरणाची शासनाने चौकशी करावी, अशी मागणी हरिष सहारे, विनोद भोयर, खुशाल आत्राम यांनी केली आहे. यासंदर्भात लोकमतने पंचायत समितीचे रोजगार हमी योजना विभागाचे अधिकारी गोपावार यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी फोन उचलला नाही. मात्र पंचायत समिती सदस्य इंदिरा मोहुर्ले यांनी सांगितले की, मी जेव्हा पं. स. सदस्य पदावर नव्हते तेव्हा माझ्या स्वमालकीच्या बोडीवर माती टाकण्याच्या कामाची मागणी २0१२-१३ मध्ये केली होती. त्यावेळी मागणी करून काम झाले नाही. परंतु जुन्या अर्जावर रोहयोतून मातीकाम मंजूर झाले. शासकीय पदावर असतांना आपण निधीतून लाभाचे काम करून घेणे योग्य नाही, असे आपले मत आहे. याबाबत जनताही आक्षेप घेऊ शकते व आपले पं. स. सदस्यत्व धोक्यात येऊ शकते. या कारणाने आलेल्या मजुरांना मी काम करू देण्यास मज्जाव केला, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र मजूर रोहयोच्या कामापासून आपल्याला वंचित करण्यात आला आहे, याची दखल घेण्यात यावी, असा आरोप करीत आहे. या भागात आधीच काम नाहीत. शासनाने रोहयोच्या माध्यमातून काढलेले कामामुळे चार ते पाच दिवसाची मजुरी मिळाली असती. ते कामही रोखण्यात आले. त्यामुळे आता मजुरांवर रिकामे बसण्याची वेळ आली आहे, अशी माहिती मजुरांनी दिली आहे. (वार्ताहर)