गरीब- गरजूंना बाेदली ग्रामपंचायत देणार मदत; सरपंच सहायता निधीची केली सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:18 PM2024-09-27T18:18:57+5:302024-09-27T18:19:43+5:30
अनाेखा प्रयाेग : रुग्णांना उपचार, शस्त्रक्रिया, हाेतकरू विद्यार्थ्यांना मिळेल दिलासा
गडचिराेली : गावातील गरीब व गरजूंना आराेग्य उपचार, हाेतकरूंना शिक्षणासाठी तसेच इतरांना संकटकाळात मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य करण्यासाठी गडचिराेली तालुक्याच्या बाेदली ग्रामपंचायतीने ‘सरपंच सहायता निधी’ची सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील हा अनाेखा उपक्रम असून राज्यातीलही अनाेखा प्रयाेग असू शकताे.
एखाद्या गंभीर आजारावर उपचार, हाेतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, गरिबांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत, अपघातात जखमी झालेल्यांना मदत, यासह विविध प्रकारच्या संकटकाळात गरीब व गरजूंना मदत करण्यासाठी राज्यातील मुख्यमंत्री सहायता निधीच्या धर्तीवर बाेदली येथे सरपंच आकाश निकाेडे यांच्या नेतृत्वात सरपंच सहायता निधीची सुरूवात सप्टेंबर २०२४ पासून करण्यात आलेली आहे. मागील तीन महिन्यात मंजुरीच्या सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आल्या.
अशी पूर्ण केली परवानगीची प्रक्रिया
बाेदली ग्रामपंचायतने महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकारातून ग्रामपंचायतला सरपंच सहायता निधी सुरू करण्याबाबत अर्ज दिला. त्यानंतर या अर्जावर मासिक सभेत चर्चा झाली. येथे चर्चा केल्यानंतर ग्रामसभेत सदर याेजनेला मंजुरी प्रदान करण्यात आली.
काेणाला देणार मदत?
सरपंच सहायता निधीतून सध्यातरी ग्रामपंचायत हद्दीतील गरजू व्यक्तींना ५ ते ७ हजार रुपयांपर्यंत सहायता दिली जाणार आहे. यासाठी गरजू व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न किमान १ लाख रुपयांच्या आतील असावे, अशी अट आहे. १ काेटी रुपयांपर्यंत निधी वाढविण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. हे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कार्यक्षेत्राबाहेरील गरजूंनासुद्धा आर्थिक मदत दिली जाईल.
अशी चालणार कार्यप्रणाली
गरजूला थेट मदत दिली जाईल. या मदतीचा लेखाजाेखा १६ सदस्यीय सरपंच सहायता निधी समितीच्या व ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीत मांडला जाईल. म्हणजेच सरपंच सहायता निधीत दानदात्यांकडून जमा झालेली रक्कम व गरजूंना वाटप केलेली रक्कम याचा लेखाजाेखा महिन्याला ठेवला जाईल.
"गरीब व गरजूंना आर्थिक मदत व्हावी, यासाठी आम्ही सरपंच सहायता निधीची सुरूवात केली आहे. या निधीत दानदात्यांनी दान केल्यास अधिकाधिक गरीब व गरजूंना संकटकाळात मदत मिळू शकेल."
- आकाश निकाेडे, सरपंच, बाेदली