बोगस डॉक्टरला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 09:59 PM2019-06-29T21:59:31+5:302019-06-29T21:59:58+5:30
कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना नि:संतान दाम्पत्याला मूल-बाळ होण्यासाठी औषधोपचार करीत फसवणूक करणाऱ्या एका बोगस डॉक्टराला पोलिसांनी शनिवारी दुपारच्या सुमारास रंगेहाथ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या कानाकोपºयात असलेल्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना नि:संतान दाम्पत्याला मूल-बाळ होण्यासाठी औषधोपचार करीत फसवणूक करणाऱ्या एका बोगस डॉक्टराला पोलिसांनी शनिवारी दुपारच्या सुमारास रंगेहाथ अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे जिल्ह्याच्या कानाकोपºयात असलेल्या बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.
जगदिश शंकर खंडारकर, असे पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉक्टराचे नाव आहे. वैरागड येथील जगदिश खंडारकर या इसमाने मागील काही दिवसांपासून कढोली येथे एका किरायाच्या इमारतीत आपला खासगी दवाखाना सुरू केला. नि:संतान दाम्पत्यांना मूल-बाळ होण्यासाठीचा उपचार तो आपल्या दवाखाण्यात गेल्या अनेक दिवसांपासून करीत होता. मात्र त्याच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र नाही, अशी माहिती गोपनिय सूत्रांकडून कुरखेडा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कुरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक प्रशांत रेळेकर, पोलीस हवालदार अमृत मेहर यांनी कढोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुवनेश्वर खुणे यांना सोबत घेऊन जगदिश खंडारकर याच्या खासगी दवाखाण्यावर धाड टाकली.
यावेळी तो अवैधरित्या रूग्णावर औषधोपचार करीत होता. उपचार करतानाच खंडारकर याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३७ अन्वये कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुनील उईके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
औषधीसह वैद्यकीय साहित्य जप्त
पोलिसांनी बोगस डॉक्टर खंडारकर याच्या कढोली येथील खासगी दवाखाण्यावर धाड टाकून येथून औषधी व इतर वैद्यकीय साहित्य जप्त केले. यावेळी खंडारकर हा रूग्णांवर औषधोपचार करीत होता.
लोकमतने यापूर्वी अनेकदा बोगस डॉक्टरांकडून रूग्णांच्या जीवाशी खेळ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित केले. मात्र प्रशासनाकडून बोगस डॉक्टरांवर कारवाई झाली नाही. अद्यापही अनेक बोगस डॉक्टर सक्रीय आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.