बोगस बदली प्रकरणाचा तपासी अधिकारी बदलला
By admin | Published: September 10, 2016 01:10 AM2016-09-10T01:10:03+5:302016-09-10T01:10:03+5:30
बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून सदर तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पुराणिक
गडचिरोलीच्या ठाणेदारांकडे सूत्र : ‘त्या’ दोन मास्टर मार्इंड कर्मचाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
गडचिरोली : बोगस शिक्षक बदली प्रकरणाचा तपास पीएसआय मुनगेलवार यांच्याकडून काढून टाकण्यात आला असून सदर तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय पुराणिक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या प्रकरणातील खरे सूत्रधार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा शोध पोलिसांकडून सुरू झाला आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी २२० शिक्षकांच्या बोगस बदल्या २०१३ साली करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर जिल्हा परिषदेतील लिपीक रूपेश शेडमाके याला अटक केली. सध्या रूपेश शेडमाके हा न्यायालयीन कोठडीची हवा खात आहे. पोलिसांच्या तपासादरम्यान या प्रकरणात त्यावेळी जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांची नावे सांगितली आहेत. या प्रकरणात गुंतून असलेल्या शिक्षकांनी सुध्दा याच दोघांची नावे सांगितले आहेत. सदर बोगस प्रकरण उघडकीस आल्यानंतर संबंधित दोन कर्मचाऱ्यांच्या बदल्या इतर तालुक्यामध्ये करण्यात आल्या होत्या. रूपेश शेडमाके याने आपले नाव तपासामध्ये सांगितले असल्याची कुणकुण माहित होताच हे दोघेही फरार झाले आहेत. या प्रकरणात हे दोघेच खरे मास्टर मार्इंड आहेत.
रूपेश शेडमाकेच्या जबाबावरून पोलिसांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास बजाविले होते. मात्र आरोपी त्यापूर्वीच फरार झाले आहेत. मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलीस संबंधित कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत या दोन कर्मचाऱ्यांचा शोध लागलेला नाही. शिक्षक बोगस बदली प्रकरणातील हे दोघेच व्यक्ती खरे सूत्रधार असल्याने त्यांच्या अटकेनंतर बरीच माहिती समोर येणार आहे. सदर दोन कर्मचारी आणखी इतरही व्यक्तींची नावे सांगणार असल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत. (नगर प्रतिनिधी)