१०५ वर्षांची परंपरा, बोनालू उत्सवाची सांगता; ३ राज्यातील हजारो भाविकांनी घेतले मल्लिकार्जुनाचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 03:17 PM2022-12-17T15:17:55+5:302022-12-17T15:23:08+5:30
भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला
कौसर खान
सिरोंचा (गडचिरोली) : तालुका मुख्यालयापासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरडा गावातील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर परिसरात दोन दिवसीय बोनालू (जत्रा) उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. यावेळी सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील जवळपास ३५ हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.
आरडा गावात असलेल्या मल्लिकार्जुन स्वामी मंदिरात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. या वर्षीसुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगाणा व आहेत. त्या भाविकांनी या उत्सवादरम्यान आवर्जून हजेरी लावली होती. भक्तगण मल्लिकार्जून स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा करीत होते. आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घालीत होते.
मल्लिकार्जुन स्वामी जत्रा ही तालुक्यातील सर्वांत मोठी जत्रा आहे. ही जत्रा भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. भाविकांच्या मनोरंजनासाठी तेलंगाणा येथील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोनालूच्या आदल्या दिवशी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मंदिर कमिटीचे रंगू बापू ज्यांच्यासह श्रीनिवास अनापर्ती, मनोज रंगू यांच्यासह गावातील नागरिकांनी सहकार्य केले. जत्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी . सिरोंचाचे पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कोरोनाकाळानंतरची पहिलीच जत्रा
दोन वर्षांच्या कोरोनाकाळात जत्रेला परवानगी नव्हती. त्यामुळे भाविकांची संख्याही मर्यादित राहात होती. या वर्षीची जत्रा निर्बंध हटल्यानंतर पहिलीच होती. त्यामुळे बोनालूसाठी यंदा भाविकांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. तेलंगाणा व छत्तीसगड राज्यातील भाविकांच्याही संख्येत वाढ झाली आहे. १२ डिसेंबर रोजी शेकडो भाविकांनी खिरीचे मडके डोक्यावर ठेवून मंदिरासभोवताल प्रदक्षिणा घातली. यामुळे यात्रा फुलून गेली होती.
काय आहे बोनालू?
बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. शिजलेली खिर झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो.
बैलबंडीने गाठले जत्रेचे गाव
अलीकडच्या काळात सर्वत्र चारचाकी वाहनांचा सुळसुळाट झालेला असला तरीही आरडा येथील बोनालू जत्रेसाठी तालुक्यातील मेडाराम, कारसपल्ली, रंगय्यापली येथील भाविक जुन्या परंपरेनुसार बैलबंडीनेच आले होते. यामुळे यात्रेच्या रस्त्यावर बैलबंड्यांची रांग लागली होती.