बंधारा दरवाज्यांच्या प्रतीक्षेत
By Admin | Published: May 5, 2017 01:10 AM2017-05-05T01:10:39+5:302017-05-05T01:10:39+5:30
मुरमुरी-येडानूर मार्गावरील नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधाऱ्यावर दरवाजे बसविण्यात आले नाही.
मुरमुरी-येडानूर मार्गावरील बंधारा : लाखो रूपयांचा खर्च पाण्यात
तळोधी (मो.) : मुरमुरी-येडानूर मार्गावरील नाल्यावर दोन वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला. मात्र या बंधाऱ्यावर दरवाजे बसविण्यात आले नाही. परिणामी सदर बंधारा निकामी ठरला आहे.
मुरमुरी-येडानूर मार्गावर नाला आहे. या नाल्याच्या सभोवताल धानाची शेती आहे. नाल्यामध्ये पावसाळाभर पाणी राहते. आॅक्टोबर, नोव्हेंबरदरम्यान या नाल्यातील पाणी कमी होत होते. नाल्यावर बंधारा झाल्यास सदर पाणी बाजूच्या शेतीला देता येईल, या उद्देशाने नाल्यावर बंधारा बांधण्यात आला. बंधाऱ्याचे बांधकाम करतेवेळीच सदर बंधारा निकृष्ट दर्जाचा होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी केल्या होत्या. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. कंत्राटदाराने बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण केले. मात्र बंधाऱ्याला दरवाजे लावले नाही. त्यामुळे बंधाऱ्यात पाणीच साचून राहत नाही. या बंधाऱ्यावर लाखो रूपयांचा खर्च झाला आहे. मात्र या बंधाऱ्याचा उपयोग सिंचनासाठी होत नसल्याने या बंधाऱ्यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च वाया गेला आहे. शक्य होत असल्यास बंधाऱ्याची दुरूस्ती करण्यात यावी, या दुरूस्तीचा खर्च कंत्राटदाराकडूनच वसूल करावा, त्याचबरोबर बंधाऱ्याला दरवाजे बसवावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सिंचाई विभागाच्या मार्फतीने नाल्यावर बंधारे बांधले जात आहेत. सदर बंधारे सिंचाई विभागातील अधिकारी, अभियंते व कंत्राटदार यांच्यासाठी केवळ कमाईचे साधन झाले आहे. (वार्ताहर)