५० हजार तेंदू पुड्यांचा बोनस मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:32 AM2018-11-01T01:32:03+5:302018-11-01T01:32:21+5:30
तालुक्यातील गर्कापेठा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पोचमपल्ली येथे २०१७ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी चार गावातील तेंदू मंजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची नोंद बोनससाठी स्वत:च्या नावे करून घेतली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील गर्कापेठा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पोचमपल्ली येथे २०१७ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी चार गावातील तेंदू मंजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची नोंद बोनससाठी स्वत:च्या नावे करून घेतली होती. परंतु मजुरांच्या आक्षेपानंतर ग्रामसभेत ग्रामसेवकांनी संपूर्ण अहवाल वाचून दाखविल्यानंतर होणारा घोळ लक्षात आला. शेवटी जि. प. महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्या निर्देशानुसार सदर बोनसची रक्कम मूळ मजुरांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.
पोचमपल्ली येथे आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजया आसम होत्या. यावेळी जि. प. महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम, पं. स. सदस्य शकुंतला जोडे, उपसरपंच वनिता कोरे, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, राकाँचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, पडाला, मारन्ना, गणेश बचलकुरा, पोलीस पाटील इप्पा श्रीनिवास, मारबार्इंना समय्या, तंमुस अध्यक्ष बिरा आत्राम, ग्रा. पं. सदस्य कुळमेथे शेखर, दासरी व्यंकटी, सुदर्शन गोमासी, बोल्ले शंकर, डोंगरे पेद्दाराजम, विरला समय्या, मारबाईना, तिरूपती, देब्बा स्वामी, पागडे गोपी, कोरते बकय्या, येलाकुची लिंगय्या, दीपेश चेन्नम उपस्थित होते.
२०१७ च्या तेंदू बोनस वाटपात घोळ होत असल्याची तक्रार आविसं कार्यकर्त्यांनी जि. प. सभापती जनगाम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सभापतींनी सरपंच व ग्रामसेवकांना तेंदू बोनस वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.
ग्रामसेवक बंडावार यांनी तेंदू वाटपाबाबतची माहिती ग्रामसभेदरम्यान वाचून दाखविल्यानंतर तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी तेंदू मजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची परस्पर स्वत:च्या नावाने रजिस्टरला नोंद करून घेतली. सदर तेंदूपुड्यांची बोनसची रक्कम हडपली जाणार होती. परंतु ग्रामसभेत तेंदू बोनस वाटपाचा लेखाजोखा ग्रामसेवकांनी मांडल्यानंतर सदर बाब उघडकीस आली. बोनसची रक्कम परत तेंदू मजुरांच्या खात्यात जमा करावी. संबंधित तेंदू फळीतील चार खातेदार या सूचनेचे पालन करणार नसतील तर त्यांची तक्रार पोलीस ठाण्याला करावी, असे निर्देश जि. प. महिला व बालकल्याण सभापती जनगाम यांनी ग्रामसेवक बंडावार यांना दिले.
जि. प. महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्या पुढाकाराने ५० हजार तेंदूपुड्यांची बोनसची रक्कम चार गावातील तेंदू मजुरांना मिळणार असल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामसभेमुळे तेंदूफळीवरील चार खातेदारांकडून तेंदूमजुरांना लुटण्याचा झालेला प्रयत्न उघडकीस येऊन तो विफल झाला.