हिवतापाची साथ रोखण्यासाठी संवेदनशील ६५८ गावांत धूर फवारणीचा 'बूस्टर'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 03:13 PM2024-09-18T15:13:10+5:302024-09-18T15:13:38+5:30
आरोग्य यंत्रणा अलर्ट : दुसरी फेरी १८ सप्टेंबरपासून
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत हिवतापाची साथ रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले. वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना, औषधोपचार व प्रभावी जनजागृतीमुळे हिवताप विभागाला हिवतापावर नियंत्रण ठेवता आले. येणाऱ्या दिवसात हिवतापाची साथ येऊ नये, यासाठी डास प्रतिबंधक फवारणीची दुसरी फेरी १८ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असून, संवेदनशील ६५८ गावांत फवारणीचा 'बूस्टर' देण्यात येणार आहे.
देसाईगंजवगळता इतर ११ तालुक्यांत जी गावे हिवतापाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. अशा गावांमध्ये जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयाच्या नियोजनात डास प्रतिबंधक फवारणीचे काम होणार आहे. पावसाळा आला की, विविध रोगांना आमंत्रण मिळते. घाणीचे साम्राज्य, घाण पाण्याचे डबके तसेच डासांची वाढती उत्पत्ती आदी कारणांमुळे जिल्ह्यात मलेरियाचाही प्रकोप वाढतो. पावसाळ्यात विविध प्रकारच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते.
साचलेल्या पाण्यातून विविध आजार उद्भवण्याचा धोका अधिक असतो. या दिवसांत डेंग्यू चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढते. यापैकी मलेरिया ताप हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो डासांमुळे होतो. या आजारामध्ये तीव्र तापासोबत इतरही काही लक्षणे दिसून येतात.
जानेवारी ते आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्ण : ५३९२
ऑगस्टअखेर ते आतापर्यंत रुग्ण : १०७७
संवेदनशील प्राथमिक आरोग्य केंद्र : १६
संवेदनशील तालुका : भामरागड
अधिक संवेदनशील केंद्र : लाहेरी व आरेवाडा
आश्रमशाळांसह वसतिगृहातील डास उत्पत्ती रोखणार
- जिल्हा हिवताप कार्यालय व जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने डास प्रतिबंधक फवारणीच्या दुसऱ्या फेरीमध्ये जिल्ह्यातील आश्रमशाळा, निवासी शाळा व वसतिगृहांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
- शासकीय, खासगी आश्रमशाळा, आदिवासी व समाजकल्याण विभागाचे २ वसतिगृह तसेच समाजकल्याण विभागाच्या निवासी शाळांमध्ये फवारणी डास प्रतिबंधक फवारणी करण्यात येणार आहे.
"सध्या भामरागड तालुका सोडला तर इतर तालुक्यात हिवतापाबाबत फारशी गंभीर परिस्थिती नाही. यंत्रणा नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. ज्या गावात तापाची साथ दिसते, अशा ठिकाणी आरोग्य कर्मचारी पोहोचून रक्तनमुने घेऊन निदान करीत आहेत. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या रुग्णांवर लागलीच औषधोपचार केला जात आहे. कोणालाही ताप आला किवा थोडेसे लक्षणे दिसली की, संबंधितांनी तत्काळ आरोग्य कर्मचाऱ्यांकडून रक्ताची तपासणी करावी. पुजाऱ्याकडे न जाता रुग्णालयात जाऊन पूर्ण उपचार घ्यावे."
- डॉ. पंकज हेमके, जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली.