काळी-पिवळीच्या धडकेत दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:49 PM2019-03-25T22:49:00+5:302019-03-25T22:49:21+5:30
काळी-पिवळी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना सोमनपल्ली गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : काळी-पिवळी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना सोमनपल्ली गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.
प्रविण मंडल (३३), नयन बैरागी (३२) दोघेही रा. विकासपल्ली अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एमएच ३३ एच ५००१ क्रमांकाचे काळी-पिवळी वाहन आष्टी येथून चामोर्शीकडे जात होते, तर चामोर्शीवरून आष्टीकडे दुचाकीस्वार येत होते. दरम्यान काळी-पिवळी व दुचाकी यांची कोनसरी-सोमनपल्ली या दोन गावादरम्यान जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. काळी-पिवळी वाहन चालकाने दोघांनाही वाहनात टाकून आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाने पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन गुन्ह्याची माहिती दिली. पुढील तपास जयदेव पाटील करीत आहेत.
घोटजवळच्या अपघातात दोघे जखमी
घोट-चामोर्शी मार्गावरील गोलाबाई मंदिरापासून एक किमी अंतरावर सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. मुलचेरा पंचायत समितीमध्ये केंद्र चालक म्हणून कार्यरत असलेले छगण वैद्य रा. कुनघाडा हे एमएच ३३-४५५६ क्रमांकाच्या वाहनाने चामोर्शीकडे जात होते. तर एमएच ३३ एन ६८१६ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने महेश शेट्टे रा. कुंभारवाही हा चामोर्शीवरून घोटकडे येत होता. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत छगण वैद्य व महेश शेट्टे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात भरती केले.