'त्या' दोघींनी दाखवली हिंमत अन् जंगलातील झाडाखालीच केली महिलेची प्रसुती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 09:17 PM2020-08-16T21:17:49+5:302020-08-16T21:20:55+5:30
घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली.
प्रतीक मुधोळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : घनदाट जंगल आणि त्यात भरून वाहणारा नाला, पुढे जाण्यासाठी रस्ता नको, अशाही कठीण परिस्थितीत हतबल न होता एका आदिवासी महिलेची भर जंगलात एका झाडाखाली प्रसुती झाल्याची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात घडली.
गट्टा आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या झारेवाडा गावातील आदिवासी महिला भारती सुरज दोरपेटी या गरोदर महिलेला १२ ऑगस्ट रोजी पोटात दुखणे सुरू झाले. प्रसुतीचे ते संकेत असल्याचे लक्षात येताच गावातील आशा सेविका सविता आलाम यांनी गट्टा आरोग्य केंद्राला त्याबाबत माहिती दिली. गट्टा केंद्राच्या कंत्राटी आरोग्य सेविका सोनी दुर्गे, आशा सेविका सविता आलाम व रुग्णवाहिका चालक हे त्या गरोदर महिलेला आणण्यासाठी निघाले. मात्र रस्त्यात असलेला गिलनगुडा नाला भरून वाहात होता. त्यावरील रपट्यावरूनही पाणी वाहात होते. अशातही रूग्णवाहिका टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या रपट्यावर एक मालवाहू ट्रक फसला होता. त्यामुळे रुग्णवाहिका झारेवाडा गावाजवळ नेणे शक्य नव्हते.
झारेवाडा गावात जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका जाणे शक्य नव्हते. त्यामुळे पायवाटेने सदर महिला कर्मचारी गावात पोहोचल्या. गरोदर महिलेला खाटेवर टाकून घनदाट जंगलातून मुख्य रस्त्याकडे ते रुग्णवाहिकेच्या दिशेने निघाले. पण यादरम्यान भारतीच्या प्रसुतीकळा आणखीच वाढल्या. आता रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचणे शक्य नाही हे लक्षात येताच आरोग्य सेविका सोनी दुर्गे व आशा सेविका सविता आलाम यांनी प्रसुतीसाठी लागणाऱ्या आपल्या साहित्यासह जंगलातच प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्या गरोदर महिलेने एका कन्येस जन्म दिला. त्यानंतर नवजात बाळासह त्या मातेला पुढील उपचारासाठी गट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
आरोग्य सेविका दुर्गे आणि आशा सेविका आलाम यांनी वेळीच धावपळ केली नसती तर बाळाच्या आणि भारतीच्या जीवास धोका निर्माण झाला असता. विपरित परिस्थितीवर मात करून दिलेल्या त्यांच्या सेवेचे परिसरात कौतुक होत आहे.