पाणीप्रश्नावरील मुख्याधिकाऱ्याच्या उदासीनतेमुळे नगरसेवकाचा सभेवर बहिष्कार
By admin | Published: March 10, 2016 01:43 AM2016-03-10T01:43:50+5:302016-03-10T01:47:22+5:30
अहेरी शहरात विविध प्रभागात पाणी समस्या तीव्र झाली आहे. १ जानेवारी रोजी पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या बैठकीत .....
अहेरी : अहेरी शहरात विविध प्रभागात पाणी समस्या तीव्र झाली आहे. १ जानेवारी रोजी पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा होऊन ३० बोअरवेल, वाढीव पाईप लाईन, नवीन विहीर बांधकाम व दुरूस्ती आदीबाबत ठराव पारित करण्यात आले होते. मुख्याधिकारी सी.एल. किरमे यांच्याकडे ते सुपूर्द करण्यात आले. परंतु मागील तीन महिन्यात मुख्याधिकाऱ्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. मुख्याधिकारी शहराच्या पाणी प्रश्नाबाबत उदासीन असल्याचा आरोप करीत समितीच्या बुधवारच्या बैठकीवर सभापती स्मिता येमुलवार, नगरसेवक श्रीनिवास चटारे, शैलेंद्र पटवर्धन, कबीर शेख, कमल पडगेलवार यांनी बहिष्कार घातला. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असल्याने शहरात विविध प्रभागात पाणीसमस्या तीव्र झाली आहे. नगर पालिकेकडे १ कोटी २६ लाखांचा निधी उपलब्ध असताना पाण्यासारखा गंभीर प्रश्नावर मुख्याधिकाऱ्यांनी काम सुरू केले नाही, असे यावेळी सभापती व नगरसेवक यांनी सांगितले. दरम्यान सभा सुरू झाल्यावर मुख्याधिकारी सी. एल. किरमे सभागृहात आले. तुमची बैठक आहे, तुम्हीच बघत बसा, मला या प्रश्नाशी काहीही देणेघेणे नाही, असे म्हणून निघून गेले. त्यानंतर सभापती व सदस्यांनी बैठकीवरच बहिष्कार टाकला. (शहर प्रतिनिधी)