चार सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार
By Admin | Published: December 31, 2015 01:30 AM2015-12-31T01:30:53+5:302015-12-31T01:30:53+5:30
चामोर्शी पंचायत समितीच्या कारभारात व विकास कामात पं. स. सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत...
चामोर्शी पं. स. ची सभा रद्द : सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा बीडीओंवर आरोप
चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीच्या कारभारात व विकास कामात पं. स. सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत पंचायत समितीच्या चार सदस्यांनी बुधवारच्या पं. स. च्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे पंचायत समितीची मासिक सभा रद्द करण्यात आली.
प्रमोद गोविंदा भगत, केशव मसाजी भांडेकर, नुमचंद पुरूषोत्तम भिवनकर व किरण मोतीराम कोवासे आदी चार पं. स. सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती शशिकला बंडू चिळंगे यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. च्या प्रशिक्षण भवनात बुधवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण मासिक सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेत बांधकाम विभागाची कामे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार योजना, सर्वशिक्षा मोहीम कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदींचा आढावा घेऊन आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी आदी विभागाच्या योजनांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र पं. स. सदस्य प्रमोद भगत, केशव भांडेकर, नुमचंद भिवनकर व किरण कोवासे यांनी संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी हे पं. स. कार्यालयात वारंवार गैरहजर राहतात. तसेच पं. स. च्या विकास कामात सदस्यांना विश्वासात घेत नाही, असा आरोप केला. तसेच ग्रामसेवक व शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आक्षेप घेऊन पंचायत समिती प्रशासनाचे ग्रामपंचायतीवर नियंत्रण नाही, असा आरोप करीत याबाबत विचारलेल्या प्रश्नांचे सभेत समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले नाही. त्यामुळे मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे चार सदस्यांनी सांगितले.
बहिष्कारामुळे पं. स. ची मासिक सभा रद्द झाल्याने तालुक्यातील विकास कामांवर चर्चा होऊ शकली नाही. सदर सभा पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)