आमदार गजबेंच्या गावात मागासवर्गीय कुटुंबावर बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:59 AM2023-06-20T11:59:20+5:302023-06-20T12:00:16+5:30
वडिलोपार्जित कब्जा वहिवाट असल्याचे स्पष्ट
गडचिरोली : देसाईगंज तालुक्यातील पोटगाव गट ग्रामपंचायतीअंतर्गत विठ्ठलगाव येथे संरक्षण भिंतीच्या वादातून अनुसूचित जातीतील एका कुटुंबावर बहिष्कार घातल्याची खळबळजनक तक्रार आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी १९ जूनला जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
पाेटगाव हे आरमोरीचे भाजप आमदार कृष्णा गजबे यांचे मूळ गाव आहे. या ग्रामपंचायतीतील विठ्ठलगाव येथील घनश्याम लांडगे यांना प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांनी १२ मार्च २०१० रोजी वनहक्क पट्ट्याने भू. मा. क्र. १४४ आराजी-०.०४ हे.आर. जमीन दिली आहे. लांडगे यांचा वडिलोपार्जित कब्जा वहिवाट असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना सदर जागेचा वनहक्क पट्टा मिळाला आहे. सदर जागेवर लांडगे हे कुटुंबासह राहतात. घराच्या बाजूला बौद्ध विहार असून, लगत लांडगे यांची खुली जागा आहे.
बौद्ध विहाराच्या संरक्षण भिंत बांधकामाकरिता शासनस्तरावरून १० लाख रुपये मंजूर आहेत. लांडगे यांच्या मालकीच्या जागेत असलेले गोबरगॅस टाक्या तोडून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. लांडगे यांनी विरोध केला असता आमदार गजबे यांनी धमकावले व त्यानंतर संपूर्ण गावाने लांडगे कुटुंबाला बहिष्कृत केले. चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी छगन शेडमाके यांनी केली आहे.
यासंदर्भात आमदार कृष्णा गजबे यांना वारंवार संपर्क केला, परंतु त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही, त्यामुळे त्यांची बाजू कळाली नाही.