१० गावांचा वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:29 AM2019-06-07T00:29:47+5:302019-06-07T00:30:16+5:30
सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
झिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर परिसरातील सोमनपल्ली भागात जोरदार वादळ आल्याने सोमनपल्ली गावापासून तीन किमी अंतरावर विद्युत खांब तुटून पडले. तसेच अनेक ठिकाणी वीज ताराही तुटल्या. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून या भागातील जवळपास १० गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी या गावातील नागरिकांना रात्री अंधारात राहावे लागत आहे.
आसरअल्ली - सोमनपल्ली दरम्यान पाच दिवसापूर्वी वादळी पाऊस बरसला. अनेक ठिकाणी वीज खांब कोसळले तसेच ताराही तुटून पडल्या. त्यामुळे पातागुडम, रायगुडम, पेंडलाया, सोमनपल्ली, कोपेला, पुल्लीगुडम आदींसह लगतची मिळून १० गावांतील वीज पुरवठा पूर्णत: बंद झाला आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज पुरवठ्याची दुरूस्ती करावी, वीज पुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी झिंगानूर परिसरातील नागरिकांनी केली आहे. झिंगानूर परिसर हा चढ भाग असल्याने येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. या भागात पाणीपातळी खालावली असल्याने हातपंपाला पाणी लागत नाही.
सोलर बॅटरीच्या सहाय्याने मोबाईल केला जातो चार्ज
गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील पातागुडम भागातील वीज पुरवठा गेल्या पाच-सहा दिवसांपासून बंद आहे. वादळाच्या तडाख्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. पातागुडम ग्रामपंचायतीमध्ये रायगुड्डम, पेंडलाया व पातागुडम आदी तीन गावांचा समावेश आहे. या तीन गावांमध्ये मागील वर्षी म्हणजे २०१८ मध्ये वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली. मात्र जोरदार आलेल्या वादळाने वीज खांब कोसळले तसेच तारा तुटून पडल्या. त्यामुळे या तीन गावातील वीज पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सोलर बॅटरीच्या माध्यमातून आपला मोबाइल चार्ज करावा लागत आहे. मोबाइल चॉर्जिंगसाठी ग्रामपंचायतीमध्ये वीज नाही. झिंगानूरसारख्या दुर्गम भागात वीज बिघाडाची दुरूस्ती करण्यास नेहमी दिरंगाई होत असते.