गटार योजनेमुळे विकास कामांना लागणार ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 11:45 PM2018-04-05T23:45:31+5:302018-04-05T23:45:31+5:30
भूमिगत गटार योजनेचे काम रखडल्याने या योजनेबरोबरच रस्ता, नाली बांधकाम आदी विकास कामांनाही ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दिगांबर जवादे।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भूमिगत गटार योजनेचे काम रखडल्याने या योजनेबरोबरच रस्ता, नाली बांधकाम आदी विकास कामांनाही ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गडचिरोली शहरात भूमिगत गटार बांधले जाणार आहे. त्यासाठी शासनाने ९२ कोटी रूपये मंजूर केले असून त्यापैकी २० कोटी रूपयांचा निधी नगर परिषदेला उपलब्ध करून दिला आहे. या कामाची निविदा नगर परिषदेने पहिल्यांदा काढली. त्यावेळी तीन कंत्राटदारांनी निविदा भरली होती. मात्र मंजूर निधीपेक्षा निविदा अधिक किंमतीच्या असल्याने सदर निविदा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर दुसऱ्यांदा निविदा काढली. यावेळी एकाही कंत्राटदाराने निविदा भरली नाही. ३१ मार्च रोजी तिसºयांदा निविदा काढण्यात आली आहे. १० एप्रिलपर्यंत निविदा सादर करायच्या आहेत. पाच दिवसांचा कालावधी उलटूनही एकाही कंत्राटदाराने अजूनपर्यंत निविदा भरली नाही. त्यामुळे तिसºयांदाही निविदा प्राप्त होणार काय, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
राज्य शासनाने रस्ता बांधकाम, नाली बांधकामसाठी जवळपास १५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांच्या लवकरच निविदा निघणार आहेत. दलित वस्ती सुधार योजना, नगरोत्थान महाअभियान योजनेतूनही निधी प्राप्त झाला आहे. नगर परिषदेने या कामांच्या निविदा सुद्धा काढल्या आहेत. मात्र रस्ता, नाली बांधकाम होण्यापूर्वी गटार योजनेचे बांधकाम होणे आवश्यक आहे. गटार योजनेपूर्वीच रस्ता व नाल्यांचे बांधकाम झाल्यास सदर बांधकाम गटार बांधतेवेळे पुन्हा तोडावे लागणार आहे. त्यामुळे रस्ता व नाली बांधकामावर झालेला खर्च पाण्यात जाणार आहे. त्यामुळे सर्वप्रथम गटार योजनेचे बांधकाम होणे आवश्यक आहे. निविदा येत नसल्याने गटार योजनेचे काम रखडले आहे. गटार योजनेच्या कामांची प्रतीक्षा केल्यास सध्या निविदा निघालेली कामे सुद्धा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. केवळ गटार योजनेमुळे शहराचा विकास थांबण्याची शक्यता आहे.
राष्टÑीय महामार्गाचेही काम थांबणार
चंद्रपूर-गडचिरोली या राष्टÑीय महामार्गाच्या कामाला चंद्रपूर जिल्ह्यातील सावलीपासून सुरुवात झाली आहे. सदर काम गडचिरोली तालुक्यातील पुलखल फाटा ओलांडून मुरखळाच्या जवळपास आले आहे. कामाची गती बघता सदर काम एक महिन्यात गडचिरोली शहरापर्यंत पोहोचणार आहे. मात्र गटार योजनेचे काम न झाल्यास राष्ट्रीय महामार्गाचेही काम थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भूमिगत गटार योजनेमुळे शहराचा कायापालट होणार आहे. तिसºयांदा निविदा काढण्यात आली आहे. तिसरी वेळ असल्याने एकही निविदा आली तरी ती स्वीकृत केली जाणार आहे. निविदा प्राप्त झाल्यानंतर लवकरच कामाला सुरुवात होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शासनाकडे पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी सुमारे २० कोटी रूपयांचा निधी आपण खेचून आणला आहे. या कामांची प्रक्रिया सुरू आहे.
- योगीता पिपरे, नगराध्यक्ष, नगर परिषद, गडचिरोली