मार्कंडादेव येथील पूल अर्धवटच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 12:45 AM2018-02-03T00:45:24+5:302018-02-03T00:45:37+5:30
विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते.
संतोष सुरपाम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते. कच्च्या स्वरूपाच्या रपट्यावरून भाविकांना यात्राकाळात धोकादायक प्रवास करावा लागतो. मात्र या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मार्कंडादेव, साखरी घाटाला जोडण्यासाठी ४७ वर्षांपूर्वी मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रात छोट्या पुलाच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. मात्र नदीपात्रात पुलाचे अर्धवटच काम करण्यात आले. गेल्या दशकापासूनच हा पूल अर्धवट स्थितीत आहे. मार्कंडादेव येथे होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
तिर्थस्थळ असलेला मार्कंडादेव येथे गेल्या काही वर्षांपासून प्रशासनातील मोठे अधिकारी व मंत्री महोदय तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येतात . मात्र यापैकी एकानेही सदर पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. यासंदर्भात मार्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.
दरवर्षी तयार होतो रपटा
चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना थेट मार्कंडादेव येथे येणे सोयीचे व्हावे, यासाठी वैनगंगा नदीपात्रात यात्राकाळात तात्पुरत्या स्वरूपाचा रपटा तयार केला जातो. मात्र हा रपटा पाण्याच्या प्रवाहाने वाहून जातो. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला दरवर्षी रपटा तयार करावा लागतो. अर्धवट पुलाचे काम पूर्ण केल्यास रपट्यावरील खर्च वाचू शकतो.