डुम्मी नाल्यावरील पुलाला पडले भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 12:10 AM2019-08-03T00:10:15+5:302019-08-03T00:10:46+5:30
एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सदरपूल कधीही वाहून जाण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या डागडुजीवर आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी पुलाचा काही भाग वाहून जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्लीपासून दोन किमी अंतरावर असलेल्या डुम्मी नाल्याच्या पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सदरपूल कधीही वाहून जाण्याचा धोका आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या डागडुजीवर आजपर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी पुलाचा काही भाग वाहून जात आहे.
डुम्मी नाल्याच्या पलिकडे डुम्मी, मरपल्ली, जव्हेली, मलमपहाडी ही गावे आहेत. या गावांसाठी ४० वर्षांपूर्वी डुम्मी नाल्यावर तीन सिमेंटचे मोठे पाईप टाकून पूल बनविण्यात आला. १० वर्षांपूर्वी या पुलाला भगदाड पडण्यास सुरूवात झाले. सदर पूल कमी उंचीचा असल्याने पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे पूल क्षतिग्रस्त होते. दरवर्षी पुलाला भगदाड पडत होते. हे भगदाड बुजविले जात होते. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च होत होते. ही बाब नागरिकांच्या लात आल्यानंतर पुलाची डागडुजी न करता नवीन बांधकाम करण्याची मागणी केली. आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे या पुलावर फार मोठे भगदाड पडले आहे. वाहत्या पाण्यामुळे पुलासाठी वापरलेले दगड कोसळत आहेत. पूर्ण पूलच वाहून जाण्याची शक्यता बळावली आहे. या गावातील नागरिकांचा एटापल्लीशी नेहमी संपर्क राहतो.
विद्यार्थी एटापल्ली येथेच शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र पुलावरून पाहणी आहे. पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे रहदारी ठप्प पडली आहे. या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या पुलावरून एखादे मोठे वाहन गेल्यास संपूर्ण पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.