कोयनगुडा नाल्यावरील पूल वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:41 PM2017-09-01T23:41:21+5:302017-09-01T23:41:57+5:30
भामरागड तालुका मुख्यालयापासून ४ किमी अंतरावर कोयनगुडा गाव आहे. भामरागड-कोयनगुडादरम्यान नाला आहे. या नाल्यावर पूल बांधकाम करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड तालुका मुख्यालयापासून ४ किमी अंतरावर कोयनगुडा गाव आहे. भामरागड-कोयनगुडादरम्यान नाला आहे. या नाल्यावर पूल बांधकाम करण्यात आले. मात्र पावसाळ्यात हा पूल वाहून गेला. त्यामुळे कोयनगुडा गावातील नागरिकांना भामरागड तालुका मुख्यालयी येण्यासाठी पाण्यातून वाट काढावी लागत आहे. पावसाळ्यात नाल्याला पूर येत असल्याने या गावाचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटतो. पक्क्या पुलाअभावी कोयनगुडावासीयांची वाट बिकटच झाली आहे.
हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पात दवाखाना आहे. या दवाखान्यापासून एक किमी अंतरावर कोयनगुडा हे गाव आहे. सदर गाव आदिवासीबहुल गाव असून येथे १०० टक्के आदिवासी नागरिकांची वस्ती आहे. या गावात ६७ घरे असून ३५० लोकसंख्या आहे. या गावाला जाण्यासाठी लोकबिरादरी प्रकल्पापासून डांबरी रस्ता आहे. शिवाय या गावात प्राथमिक शाळा, अंगणवाडीही आहे. मात्र या गावालगत असलेल्या नाल्यावर निकृष्ट दर्जाचा पूल बांधण्यात आला. त्यामुळे अल्पावधीतच हा पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेला. त्यामुळे कोयनगुडावासीयांची वाट पुन्हा धोकादायक झाली आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात या नाल्यातून नागरिकांना प्रवास करून हेमलकसा तसेच भामरागड गाठावे लागते.
सदर गावात दुकाने नाहीत. त्यामुळे साहित्य खरेदीसाठी व इतर महत्त्वपूर्ण कामाकरिता या गावातील नागरिकांना दररोज हेमलकसा व भामरागडात यावे लागते. मात्र अद्यापही गावालगतच्या नाल्यावर पक्क्या स्वरूपाचा उंच पूल बांधण्यात आला नाही. त्यामुळे या गावातील नागरिक तळाशी असलेल्या भिंतीवरून कसेबसे पायी येत हेमलकसा गाठतात.
कंबरभर पाण्यातून जीव मुठीत धरून कोयनगुडावासीयांना प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे सुप्रसिद्ध मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी काढलेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या चित्रपटामुळे कोयनगुडा गावाची ओळख संपूर्ण देशासह जगभरात झाली. मात्र चित्रपटातून प्रसिद्ध आलेल्या कोयनगुडावासीयांचा वनवास अद्यापही कायम आहे. ग्रामस्थांच्या समस्यांकडे जिल्हा व तालुका प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
प्रशासनासह लोकप्रतिनिधी असंवेदनशील
अहेरी उपविभागातील आदिवासीबहुल दुर्गम व नक्षल प्रभावित असलेल्या भामरागड तालुक्यात रस्ते, शिक्षण, आरोग्यासह विविध समस्या कायम आहेत. कोयनगुडावासीयांना पक्क्या पुलाअभावी दरवर्षीच्या पावसाळ्यात पाण्यातून वाट काढावी लागते. साहित्य खरेदी व विविध कामासाठी नागरिकांना हेमलकसा येथे यावे लागते. मात्र या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचे उंच पूल बांधण्याच्या कामाकडे प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही याकडे कानाडोळा करीत आहेत. त्यामुळे कोयनगुडावासीयांमध्ये प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रती तीव्र रोष दिसून येत आहे. भामरागड तालुक्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सदर गावाला भेट देऊन गावकºयांची समस्या जाणून घ्यावी, नाल्यावर मोठा उंच पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.