पुलावर दगड टाकून बस केली मार्गस्थ
By Admin | Published: July 7, 2016 01:31 AM2016-07-07T01:31:37+5:302016-07-07T01:31:37+5:30
अहेरी-पेंढरी-गडचिरोली बस प्रवाशांना घेऊन अहेरीवरून निघाली. मात्र देवदा व हालेवारा गावाच्या दरम्यान पुलावर पावसामुळे मोठा खड्डा पडला.
वाहक-चालकांचा पुढाकार : सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली
अहेरी : अहेरी-पेंढरी-गडचिरोली बस प्रवाशांना घेऊन अहेरीवरून निघाली. मात्र देवदा व हालेवारा गावाच्या दरम्यान पुलावर पावसामुळे मोठा खड्डा पडला. यामुळे या बसच्या वाहक-चालकाने स्वत: पुढाकार घेऊन खड्ड्यात दगड टाकून रस्ता तयार केला. त्यानंतर येथून महामंडळाची सदर बस पुढे मार्गस्थ केली. सदर प्रकार शनिवारी घडला.
अहेरी आगारातून एमएच-४०-६०४२ क्रमांकाची अहेरी-एटापल्ली-पेंढरी मार्गे बस गडचिरोलीसाठी सोडण्यात आली. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने हालेवारा-देवदा मार्गावरील पुलावरून पाणी वाहून गेल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूस मोठा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. अहेरीवरून गडचिरोलीसाठी निघालेली राज्य परिवहन महामंडळाची सदर बस हालेवारा-देवदाजवळ पोहोचल्यावर सदर परिस्थिती बस वाहक व चालकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर बस वाहक परमेश्वर ईश्वर शेट्टी व चालक हनमंत पुल्लीवार यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने या पुलावर दगड टाकून कच्चा रस्ता तयार केला व त्यानंतर सदर बस पुढे मार्गस्थ केली. बसमधील प्रवाशांचे हाल होऊ नये, तसेच प्रवाशांचा वेळ व्यर्थ जाऊ नये, यासाठी इतरांची वाट न बघता आम्ही स्वत:च पुढाकार घेऊन दगड टाकून रस्ता तयार केला, असे या बसच्या वाहकाने सांगितले. बसमधील प्रवाशांनी बस वाहक व चालकाच्या या कामगिरीचे कौतुक केले. बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चालक-वाहकाला त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)
ठेंगण्या पुलामुळे पावसाळ्यात अनेकदा अडथळा
अहेरी-एटापल्ली-पेंढरी मार्गावर हालेवारा-देवदा दरम्यान नाल्यावर एक छोटा पूल आहे. मात्र सदर पूल ठेंगण असल्याने दमदार पावसाने या पुलावरून पाणी वाहते. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. सदर पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने लावून धरली आहे. मात्र याकडे प्रशासनासह शासनाचे व लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातही वाहतूक ठप्प होण्याचा धोका कायम आहे. वाहतूक ठप्प होऊन या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो.