वैनगंगेवरील पूल ठरतोय कर्दनकाळ
By admin | Published: May 22, 2014 01:06 AM2014-05-22T01:06:31+5:302014-05-22T01:06:31+5:30
आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावरील लोखंडी कठडे अपघाताने तुटल्याने या पुलावर अपघात होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
आष्टी : आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावरील लोखंडी कठडे अपघाताने तुटल्याने या पुलावर अपघात होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुलावरील कठडे तुटल्याने नेहमी अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांसाठी सदर पूल कर्दनकाळ ठरत आहे. आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे ट्रक अपघातात तुटले. त्यामुळे पुलावरील ५ ठिकाणच्या कठडे तुटले आहेत. ४ ते ५ वेळा पुलावर अपघाताच्या घटना घडूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. मागील वर्षी पुलावर इंडीका गाडीने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात अहेरी येथील अभियंत्याची इंडीका कठडे तोडून नदीपात्रात कोसळली. यावर्षी पेपरमिल मध्ये लगदा घेऊन जाणारा ट्रक पुलावरील कठडे तोडून नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात उमरी येथून विठ्ठलवाडाकडे जाणार्या महेंद्रा पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन कठडे तोडून नदीपात्रात कोसळले होते. यात चालक देवराव लडके याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात आष्टी येथील पेपरमिलमधील कागद नेण्यासाठी बल्लारपूरवरून येत असलेला ट्रक नदी पुलावरून उजव्या बाजुला लोखंडी कठडे तोडून पात्रात कोसळला. यात चालक शिवकुमार कौर याचा ट्रकमध्ये दबुन जागीच मृत्यू झाला. यंदा ३ महिन्यात चार गाड्या पुलाचे कठडे तोडून नदीपात्रात कोसळल्या. नदी पुलावर डाव्या बाजुला दोन ठिकाणी तर उजव्या बाजुला तीन ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पुलावरून वाहन काळजीपूर्वक चालवावे लागत आहे. पुलावरून ऑटो, टॅक्सी व दुचाकी वाहनासहित अनेक वाहनांची रैलचैल असते. शिवाय चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून असल्याने नेहमीच या मार्गावर वर्दळ असते. सदर पुलावर नेहमीच अपघात होत असतांनाही संबंधित विभाग कठडे लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुलावरील लोखंडी कठडे त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाने लावावे, अशी मागणी आष्टी येथील नागरिकांकडून होत आहे.