गडचिरोली जिल्ह्यात प्राणहिता नदीवरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 01:23 PM2020-05-15T13:23:54+5:302020-05-15T13:25:50+5:30
अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.
प्रतीक मुधोळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरीजवळील वांगेपल्ली गावालगत प्राणहिता नदीपात्रात महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या पुलाचे काम अंतिम टप्य्यात आले आहे. बहूप्रतिक्षित पुलाचे काम येत्या दहा दिवसांत पूर्ण होणार असून येत्या काही दिवसात सर्व सामान्य जनतेसाठी हा खुला होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्याला जोडणारा या पुलाचे बांधकाम तेलंगणा राज्य करीत आहे. चोवीस पिल्लर व अंदाजित नव्वद कोटी किंमत असलेल्या हा पूल हा दोन राज्याला जोडणारा असून येत्या पावसाळ्यात नागरिकांना या पुलावरून सीमापार करता येणार आहे.
प्राणहिता नदीवर आधी पूल नसल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना दुचाकीवरून प्रवास करताना नदीत बुडून मृत्यूला ही सामोरे जावे लागले आहे. तेलंगणा राज्याततील गुडेम, कवटाला, बेज्जूर,सिरपूर, कागजनगर हे महत्वाचे गावे अहेरी शहरापासून ७० किमी अंतराच्या वर्तुळात आहे. विशेष म्हणजे अहेरी उपविभागीय जनतेला नजिकचे रेल्वे स्थानक आधी बल्लारपूर होते मात्र पूल पूर्ण झाल्यामुळे सिरपूर कागजनगर हे रेल्वे जंक्शन हे सर्वात जवळ असणार आहे.
महाराष्ट्र व तेलंगणा राज्यातील नागरिकांचे रोटी व बेटीचे व्यवहार आणखी घनिष्ठ होणार आहे. महाराष्ट्र राज्यालगत असलेल्या तेलंगणा राज्यातील अनेक गावातील नागरिक खरेदीसाठी अहेरी बाजारपेठेत येत असतात आणि अहेरी परिसरातील अनेक विवाह संबंध व नातेसंबंध तेलंगणा राज्यात जुळून आहे.
तेलंगणाचे आमदार कोनेरू कोनप्पा यांनी या पुलाच्या बांधकामांसाठी विशेष प्रयत्न केले व मागील फडणवीस सरकार कडून ही सहकार्य केले गेले होते.
येत्या दहा ते पंधरा दिवसात पुलाचे बांधकाम पूर्ण होणार आहे आणि पुलापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम ही सुरू झाले आहे. पावसाळ्यात होणारी नागरिकांची गैरसोय आता थांबणार आहे.
मात्र सध्या कोरोनाचे सावट असल्याने राज्याच्या सीमा सील आहेत त्यामुळे दोन्ही राज्याच्या नागरिकांना प्रत्यक्षपणे व्यवहार आणि ये जा करण्यासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.