झुरी नाल्याच्या पुलाला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:49 PM2018-08-30T23:49:01+5:302018-08-30T23:49:35+5:30
एटापल्ली-जारावंडी मार्गावर असलेल्या झुरी नाल्याच्या दुरूस्तीवर मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ४० लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पाण्यात झुरी नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काम निकृष्ट झाले असल्याचे स्पष्ट होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्ली-जारावंडी मार्गावर असलेल्या झुरी नाल्याच्या दुरूस्तीवर मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ४० लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पाण्यात झुरी नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काम निकृष्ट झाले असल्याचे स्पष्ट होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
एटापल्लीपासून १८ किमी अंतरावर देवदा ते हालेवारा या दोन गावांदरम्यान झुरी नाला आहे. एटापल्ली-कसनसूर-जारावंडी मार्गाने पुढे गडचिरोली, धानोरा व छत्तीसगड राज्यात जाता येते. या मार्गावर शेकडो गावे आहेत. या भागात कार्यरत शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक याच मार्गाने गडचिरोली गाठतात. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी सदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील वर्षी झुरी नाल्यावर भगदाड पडले होते. एसटी किंवा जड वाहन गेल्यास सदर पूल कधीही कोसळून धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे मागील वर्षी एसटी बंद ठेवण्यात आली होती. परिणामी या भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना फार मोठी अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम विभागाने पूल दुरूस्तीसाठी ४० लाख रूपये मंजूर केले. त्यातून पुलाची दुरूस्ती झाली. मात्र काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे पावसात पुलाच्या दोन्ही बाजुची माती खचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या आतील भागातील माती निघून गेल्याने या ठिकाणावरून जड वाहन केल्यास पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीही पुलाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पुलाची दुरूस्ती करण्याऐवजी नवीन पूल बांधणे आवश्यक होते. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्याचा परिणाम दिसून आला असून सहा महिन्यात ४० लाखांचा खर्च वाया गेला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आहे.