थोडक्यात बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:34+5:302021-03-01T04:42:34+5:30

गडचिरोली : मुरमाडी, रानखेडा, बेलगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार ...

Brief news | थोडक्यात बातम्या

थोडक्यात बातम्या

Next

गडचिरोली : मुरमाडी, रानखेडा, बेलगाव परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोल पंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल घेऊन जातात. गरजू दुचाकीस्वारांकडून लीटरमागे २० ते ३० रुपये जादा उकळतात.

गंजलेले खांब धाेक्याचे

वैरागड : येथील अनेक वॉर्डातील रस्त्यालगत असलेले विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे.

सोनसरीत भ्रमणध्वनी सेवा कुचकामी

कुरखेडा : तालुक्यातील सोनसरी, उराडी परिसरात बीएसएनएलची भ्रमणध्वनी व दूरध्वनी सेवा पूर्णत: ठप्प झाली आहे. बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे शिक्षकांकडून होणारे सरल प्रणालीचे ऑनलाइन काम प्रभावित असल्याचे दिसून येते.

बायोगॅस अनुदान मिळते ताेकडे

गडचिरोली : जिल्ह्यातील ९० टक्के कुटुंबांकडे पशुधन उपलब्ध आहे. त्यामुळे १०० टक्के अनुदानावर शासनाकडून बायोगॅस संयंत्र बांधून दिल्यास, या कुटुंबांना बिनाखर्ची गॅसची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामीण भागात गोधन आहे.

गांधी सभागृहाच्या मागे घाणीचे साम्राज्य

गडचिरोली : स्थानिक इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी सभागृहाच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात घाण पसरली असून, याकडे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. या परिसरातील दुकानदार याच ठिकाणी लघुशंकेसाठी जातात.

लाइनमनची पदे भरा

एटापल्ली : महावितरण कंपनीने ग्राहकांच्या संख्येनुसार वीज कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. एटापल्ली तालुक्यातील लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे वीज सहायकाची कमी पदे मंजूर आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे जंगलांनी वेढली आहेत. दुर्गम भागातील वीजपुरवठा लवकर सुरळीत हाेत नाही.

वास्तूची दुरुस्ती करा

सिरोंचा : ब्रिटिशकालीन सत्ताकाळात सिरोंचा तालुका मुख्यालयी हवामान खात्याच्या अखत्यारित असलेल्या पर्जन्यमापक वास्तूची दुरवस्था झाली आहे. पूर्णत: दगडाने बांधण्यात आलेल्या या वास्तूची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक वर्षांपासून ही मागणी हाेत आहे.

गतिराेधक बसवा

आलापल्ली : येथील सिरोंचा पुलाजवळ असलेल्या भंबारा चौकात भामरागड, चंद्रपूर, आलापल्ली व अहेरी हे चारही मुख्य मार्ग एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे आवश्यक आहे. मात्र, गतिरोधक नसल्याने सदर चौकात अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे गतिराेधक बसवावे.

मोकाट कुत्र्यांमुळे धोका

भामरागड : दिवसेंदिवस शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगरपंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेक वेळा नगरपंचायतीकडे केली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले.

सिंचन क्षेत्रात झाली घट

रांगी : परिसरातील मोहली, महावाडा, निमनवाडा गावांतील अनेक शेतकऱ्यांनी मामा तलावाच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

सुरक्षा कवचाविना डीपी

देसाईगंज : तालुक्यातील अनेक ठिकाणी विद्युत कंपनीच्या डीपी खुल्या अवस्थेत पडून आहेत. विद्युत प्रवाहाचा पुरवठा या उघड्या डीपीमधून होत आहे. त्यामुळे त्यापासून केव्हाही मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, विद्युत कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

पुलाची उंची वाढवा

धानोरा : तालुक्यातील कारवाफा नाल्यावरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा सदर मार्ग बंद राहत असल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निवाऱ्यांची दुरवस्था

गडचिरोली : येथून आरमोरीकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या मोहझरी, वसा, देऊळगाव येथील प्रवाशी निवाऱ्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम करताना, त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.

शिव मंदिर जीर्णावस्थेत

गडचिरोली : तालुक्यातील मरेगाव येथे शिव मंदिर आहे. सदर मंदिर हेमाडपंथी आहे. अमिर्झापासून चार किमी अंतरावर असलेल्या या मंदिराकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे सदर मंदिर जीर्णावस्थेत पोहोचले आहे. सदर मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले होते.

शाळांची दुरुस्ती करा

सिरोंचा : तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांच्या इमारतींना ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. या शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत पोहोचल्या आहेत. या इमारतींचे निर्लेखन करून नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे. सिराेंचा तालुक्याच्या दुर्गम भागात शाळांच्या इमारती खराब आहेत.

नाल्यांचा उपसा करा

गडचिरोली : आरमोरी मार्गावरील नाल्या मागील अनेक दिवसांपासून उपसण्यात आल्या नाही. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या मार्गावर व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर कचरा नाल्यांमध्ये फेकत असतात. त्यामुळे नाल्या लवकरच तुंबतात. कारवाई करण्याची मागणी आहे.

स्वच्छतागृहाचा अभाव

धानोरा : चातगाव येथील बसथांब्यावर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने, त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे चातगाव बसस्थांब्यावर स्वच्छतागृहाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे. चातगाव हे धानाेरा मार्गावर असून, येथे शेकडाे नागरिक दरराेज आवागमन करीत असतात.

Web Title: Brief news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.