अवैध दारूविक्रेत्यांना तडीपार करा
By admin | Published: May 14, 2016 01:15 AM2016-05-14T01:15:48+5:302016-05-14T01:15:48+5:30
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक व विक्री केली जात आहे.
तहसीलदारांना निवेदन : अहेरीच्या महिलांची मुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्र्यांकडे मागणी
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर अवैध दारूची वाहतूक व विक्री केली जात आहे. अहेरी उपविभागातही परराज्यातून दारू आणून अवैधरित्या ती विकली जात आहे. एवढेच नव्हे तर सकाळ व सायंकाळच्या सुमारास मद्यपींकडून चौकात तसेच स्वत:च्या घरी विनाकारण धिंगाणा घातला जातो. याचा कुटुंबीय व समाजातील लोकांना नाहक त्रास होतो. त्यामुळे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांवर कारवाई करावी व अवैध दारूची विक्री करणाऱ्यांना तडीपार करावे, अशी मागणी अहेरी येथील महिला आक्रोश अवैध दारूबंदी समितीने मुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
समितीच्या वतीने अहेरी येथे अनेक ठिकाणी अवैध दारूविक्रेत्यांवर धाडी घालून कारवाई केली जात आहे. परंतु पोलिसांना घटनास्थळी येऊन अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी वेळ मिळत नाही. पोलीस कर्मचारी उलट दारू पकडणाऱ्या महिलांनाच उलटसुलट बोलतात. योग्य सहकार्यही करीत नाही. महिला आक्रोश अवैध दारूबंदी समितीच्या महिला दारूबंदीसाठी पुढाकार घेऊन आहेत. महिलांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये, मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, भांडण, तंटे होऊ नयेत, या हेतूने समिती प्रयत्न करीत आहे. असे असताना सुद्धा समितीच्या महिलांना प्रोत्साहित न करता त्यांचा दारूबंदी मोहिमेतील उत्साह कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अहेरी उपविभागात मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असेल तर या दारूबंदीला काय अर्थ? अवैध दारूविक्री, वाहतूक रोखण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. केवळ दारूबंदीचे सोंग जिल्ह्यात सुरू आहे. मात्र अनेक भागात खुल्या स्वरूपात अवैध दारूविक्री व वाहतूक जोरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)