ब्रिटिशकालीन विश्रामगृह दुरवस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:29 PM2018-12-03T22:29:09+5:302018-12-03T22:29:39+5:30
अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वेलगूर : अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.
वेलगूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये इंग्रजांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. स्वातंत्र्यानंतर वन विकास महामंडळाकडे विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी आली. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या विश्रामगृहातील कवेलू, दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विश्रामगृहासभोवताल वृक्ष-वेली वाढल्या आहेत. फरशीही पूर्णता फुटलेली आहे. परिसरात कचरा उगवला आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून जपलेला वारसा नष्ट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वन विकास महामंडळाने या विश्रामगृहाची दुरूस्ती व रंगरंगोटी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पर्यटनाला वाव
वेलगूर टोलापासून चार किमी अंतरावर जंगलात झिरकांबंडा नावाचे ठिकाण आहे. येथे मोठमोठ्यात दगडातून वर्षभर झरे वाहत असतात. त्यामुळे या स्थळाचा विकास केल्यास पर्यटनाला वाव मिळेल. तसेच ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची दुरूस्ती झाल्यास बाहेरील पर्यटकांसाठी ही आकर्षणाचे स्थळ निर्माण होईल, पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगारही मिळेल.