ब्रिटीशकालीन वैभव हरपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:42 PM2018-08-13T22:42:25+5:302018-08-13T22:42:42+5:30
ब्रिटिशांच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अशी सिरोंचाची ओळख होती. जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण येथूनच चालायचे. पण आज सिरोंचा एकाकी पडले आहे. त्यावेळचे पुरातन अवशेषही नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
कौसर खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : ब्रिटिशांच्या काळात जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण अशी सिरोंचाची ओळख होती. जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण व अर्थकारण येथूनच चालायचे. पण आज सिरोंचा एकाकी पडले आहे. त्यावेळचे पुरातन अवशेषही नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.
ब्रिटीश कारकिर्दीत सिरोंचा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण होते. येथील विश्रामगृह आजही त्याची साक्ष देते. या मुख्यालयातूनच संपूर्ण जिल्ह्याचे व्यवहार चालत होते. कलेक्टर येथूनच आपला रक्षकांचा ताफा घेऊन संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करित होते. यात आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश (आताचे छत्तीसगड) या राज्याचा काही भाग समाविष्ट करून अप्पर गोदावरी जिल्हा निर्माण केला होता. म्हणूनच सिरोंचात आजही बहुतांश लोक तेलगू भाषिक आहेत. लागूनच असलेल्या मध्यप्रदेशाची हिंदी भाषाही त्यांना शिकावी लागली. मे १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आल्याने पुन्हा मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली. आता या तीनही भाषांचा संगम येथे पहायला मिळतो. पण आज हे सिरोंचा प्रत्येक बाबतीत उपेक्षितच आहे.
बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने परराज्यात रोजगाराकरिता भटकंती करावी लागत आहे. हाताला काम नसल्याने वेटबिगारी करण्यास गेलेल्या काही युवकांची तेलंगणातील वरंगल येथून काही महिन्यांपूर्वी सुटका आणण्यात आली. ग्रामीण भागात आजही बिकट परिस्थिती आहे. सिरकोंडा ते झिंगानूर या रस्त्यावरील प्रवास म्हणजे जीव मुठीत घेऊन करावा लागतो. राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. कोटयवधी रूपये खर्च करूनही निजामाबाद ते जगदलपूर या राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचे उद्दीष्ट अद्यापही अपूर्णच आहे. इंद्रावती व प्राणहीता नद्यांवर अद्यापही पुलाचे बांधकाम करण्यात आले नाही.
तालुक्यात आरोग्यसेवा देखील कुचकमी ठरत आहे. एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सोईसुविधा पूरेपुर नसल्याचे निदर्शनास येते. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या आरोग्य केंद्राची पाहणी करून सूचना केल्या. पण ग्रामीण रूग्णालयातील समस्याही सुटल्या नाही. वेळोवेळी औषधांचा तुरवडा जाणवत असतो. ज्यांची आर्थिक क्षमता आहे ते जवळच्या तेलंगणा राज्यात उपचाराकरिता जातात.
शेतकºयांसाठी शेतीही बेभरवशाची झाली आहे. अनेक वेळा नुकसान सहन करावे लागले. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे देखील शेतकºयांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. मजुरीचे दर कमी असल्याने अनेक स्त्री व पुरूष तेलंगणात रोवणीच्या कामाकरिता स्थलांतर करतात. हे चित्र कधी बदलेल असा प्रश्न तालुकावासियांना पडला आहे.