बीएसएनएल अधिकाऱ्यांचे धरणे
By admin | Published: November 12, 2016 02:20 AM2016-11-12T02:20:40+5:302016-11-12T02:20:40+5:30
बीएसएनएलमधील सात अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झज्ञले असतानाही त्यांना रिलीव्ह करण्यात आले नाही.
स्थानांतरण थांबले : दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशनचा पुढाकार
गडचिरोली : बीएसएनएलमधील सात अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झज्ञले असतानाही त्यांना रिलीव्ह करण्यात आले नाही. जिल्हा अभियंता सय्यद इलीयासुद्दीन यांनी खोटी माहिती वरिष्ठ स्तरावर सादर केली आहे, असा आरोप करीत दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन या अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी कॉम्प्लेक्स येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
गडचिरोली येथे दोन वर्ष सेवा केली असता, अधिकाऱ्यांच्या आवडीच्या ठिकाणी त्यांची बदली केली जाते. त्यामुळे काही अधिकारी गडचिरोली येथे सेवा देण्यास तयार होतात. सात अधिकाऱ्यांचे स्थानांतरण मागील अनेक महिन्यांपासून झाले आहे. त्यांच्या जागी दुसरे अधिकारी रूजूसुद्धा झाले आहेत. तरीही जिल्हा अभियंता सय्यद इलीयासुद्दीन यांनी मुंबई सर्कल आॅफिसला चुकीची माहिती दिली. त्यामुळे या सात अधिकाऱ्यांचे अजुनपर्यंत स्थानांतरण झाले नाही. प्रशासनाला अनेक विनंत्या करूनही त्यांना सोडण्यात आले नाही. हा बीएसएनएल अधिकाऱ्यांवर होत असलेला अन्याय आहे. अशा प्रकारे अन्याय झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्यास अधिकारी तयार होणार नाही. जिल्हा अभियंता इलीयासुद्दीन यांचे एक वर्षापासून स्थानांतरण झाले आहे. मात्र ते गडचिरोलीत राहण्यास इच्छुक आहेत हे न समजणारे कोडे आहे. इलीयासुद्दीन यांचे त्वरित स्थानांतरण करावे, यासह इतरही पात्र अधिकाऱ्यांचे स्थानांतरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्त्व दूरसंचान निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष एस. आर. काळमेघ, एरिया सेक्रेटरी सचिन सरोदे, सीडब्ल्यूएस मेंबर टी. बी. वानखेडे, अध्यक्ष एस. आर. वट्टमवार, सेक्रेटरी किशोर कापगते यांनी केली. (नगर प्रतिनिधी)
गडचिरोली जिल्ह्यात बदली झालेले नवीन अधिकारी रूजू झाले नाही. त्यामुळे जुन्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले नाही, ज्या अधिकाऱ्याचे पर्यायी अधिकारी रूजू झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले आहे. आपला रिलिव्हर आला नाही. त्यामुळे आपली बदली होऊनही गडचिरोली येथे थांबावे लागत आहे. आपल्या कार्यकाळापासून येथील बीएसएनएल अधिकाऱ्यांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे ते आपल्याविरोधात नेहमीच उठाव करतात.
- सय्यद इलीयासुद्दीन, जिल्हा अभियंता, बीएसएनएल, गडचिरोली