बीएसएनएल सेवा चौकीदाराच्या भरवशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 11:13 PM2017-09-14T23:13:26+5:302017-09-14T23:13:52+5:30
भामरागड येथील दूर संचार विभागाच्या कार्यालयात एकही कर्मचारी किंवा अभियंता नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागड येथील दूर संचार विभागाच्या कार्यालयात एकही कर्मचारी किंवा अभियंता नाही. या कार्यालयाचा कारभार चौकीदाराच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास तो दुरूस्त होत नसल्याने मोबाईलधारक कमालीचे त्रस्त आहेत.
भामरागड तहसील कार्यालयातील ब्राडबँड सेवा मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद पडली. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर माहिती पाठविण्यास अडचण निर्माण होत होती. परिणामी नायब तहसीलदार कोकोडे यांना कार्यालयीन काम सोडून हेमलकसा येथे जावे लागले. बीएसएनएलच्या वतीने भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी टॉवर उभे केले आहे. सदर टॉवर थ्री-जी असल्याचे बीएसएनएल विभागाचे म्हणणे आहे. मात्र सदर टॉवर टू-जीचीही इंटरनेट स्पीड देत नाही. बºयाचवेळा फोन सुध्दा लागत नाही. त्यामुळे नागरिक व पोलीस विभागाचे कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. भामरागड येथे एकही पद भरले नसल्याने अहेरी येथील कर्मचारी त्रस्त आहेत. अनेक वेळा तक्रार केल्यानंतर एखादा कर्मचारी भामरागड येथे पाठविल्या जाते.
पूर्वी केवळ हेमलकसा येथे टॉवर होते. आता मात्र एलडब्ल्यूई योजनेंतर्गत केंद्र शासनाने जवळपास १० टॉवर बांधले आहेत. या टॉवरच्या देखभाल व दुरूस्तीसाठी भामरागड येथे स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक आहे. मात्र याकडे बीएसएनएल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
चौकीदारच निभावतो अभियंत्याची भूमिका
भामरागड येथे एकही अभियंता किंवा तांत्रिक कर्मचारी नाही. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या चौकीदारालाच काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास नागरिक बोलवितात. इकडे तिकडेचे वायर जोडून ब्रॉडबँड सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो.