वीज पुरवठा खंडित होताच् बीएसएनएलची सेवा पडते ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 02:55 PM2024-11-19T14:55:01+5:302024-11-19T14:56:50+5:30

ग्राहक कमालीचे त्रस्त : फोन लागत नाही, आवाजही येत नाही

BSNL services are suspended when power supply is interrupted | वीज पुरवठा खंडित होताच् बीएसएनएलची सेवा पडते ठप्प

BSNL services are suspended when power supply is interrupted

लिकेश अंबादे 
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची :
कोरची शहरांमध्ये बीएसएनएलचे दोन टॉवर आहेत. त्यापैकी तहसील कार्यालय परिसरमधील बीएसएनएल टॉवरची सेवा नेहमीच कुचकामी ठरत आहे. या परिसरात शासकीय व प्रशासकीय कार्यालय असून ग्राहकांना बीएसएनएल सेवा वेळेवर मिळत नसल्याने अडथळा निर्माण होत आहे. तालुक्यातील विद्युत सेवा ठप्प झाली की बीएसएनएल सेवासुद्धा ठप्प पडत आहे. फोन लागत नाही लागला तर आवाज येत नाही अशा अडचणी निर्माण होत आहेत.


कोरची तालुक्यात अनेक ठिकाणी बीएसएनएलच्या थ्री-जीचे टॉवर उभारले आहेत; परंतु कोरची तहसील, मसेली, कोटगुल, बेतकाठी या गावातील विद्युत खंडित होताच ग्राहकांच्या मोबाईलमध्ये इंटरनेटही चालत नाही. महागडे रिचार्ज करूनही बीएसएनएल सेवा कुचकामी ठरत आहे. त्यामुळे ग्राहकांची डोकेदुखी वाढली आहे. काही ग्राहक बीएसएनएल सेवा बंद करून इतर कंपन्यांची सेवा सुरू करत आहेत.


कोरची शहरातील तहसील ऑफिस परिसरात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर निर्भर अनेक शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत. त्यामध्ये पोलिस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, गटसाधन केंद्र, नगरपंचायत कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, आयटीआय, शासकीय आश्रमशाळा, वनश्री महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तालुका कृषी कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालये आहेत. या कार्यालयात काम करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बीएसएनएल टॉवरची सेवा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.


इतर कंपन्यांकडे वळताहेत ग्राहक
बीएसएनएल ही भारत सरकारची कंपनी आहे. अगदी सुरुवातीला याच कंपनीचे टॉवर कोरची तालुक्यात असल्याने नागरिकांनी बीएसएनएलचे सीम खरेदी केले. आता मात्र खासगी कंपन्यांनी तालुक्यासह ग्रामीण भागात टॉवर उभारले आहेत. खासगी कंपन्यांची सेवा सुरू होताच नागरिक या कंपन्यांचे सीम खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे.


कोरची शहरात सेवेचा दर्जा अतिशय सुमार
तालुक्यातील बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. या गावांमध्ये मोबाइल कव्हरेजच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केल्यास बीएसएनएलकडून जंगलाचे कारण दिले जाते. मात्र कोरची या तालुकास्थळीसुद्धा सेवा अतिशय खराब आहे. इंटरनेटची गती अतिशय कमी असल्याने बीएसएनएलप्रति ग्राहकांमध्ये नाराजी आहे.


"वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण होत आहे. त्यामुळे बीएसएनएल नेटवर्कची समस्या होते. नवीन बॅटऱ्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. नवीन बॅटऱ्या लागल्यानंतर ही समस्या लवकरच सुटेल." 
- रवी आंबिलकर, कनिष्ठ दूरसंचार अधिकारी, बीएसएनएल

Web Title: BSNL services are suspended when power supply is interrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.