गोदाम बांधा, साडे बारा लाखांचे अनुदान मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:20 PM2024-07-25T15:20:14+5:302024-07-25T15:22:23+5:30
Gadchiroli : शेतकरी उत्पादक कंपनी, संघाच्या खात्यावर लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विविध केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत, राष्ट्रीय अन्न आणि पोषण अभियानाअंतर्गत २०२४-२५या आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामांच्या बांधकामासाठी वास्तविक खर्चाच्या ५० टक्के किंवा १२ लाख ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे. शासनाकडून सदर मिळणार असल्याने या योजनेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषांनुसार डिझाइन, तपशील, खर्च अंदाजानुसार त्याच आर्थिक वर्षात गोदामाचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला रास्त व नाममात्र किंमत आकारून साठवणुकीसाठी गोदामाचा वापर करणे बंधनकारक आहे. या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही होत आहे.
कागदपत्रे काय लागतात?
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अर्जासोबत जमिनीचा सातबारा, आधारकार्ड, बैंक खाते आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- ज्या कार्यक्षेत्रात शेतकरी उत्पादक कंपनी, संघ आहे त्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील विहित प्रपत्रात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र, कंपनीच्या लेटर हेडवर अर्ज, शेतकरी उत्पादक कंपनी कमिटी ठराव, मागील तीन वर्षाचे ऑडिट, ज्या जागेवर गोदाम उभारणी करायची आहे, त्या जागेचा सातबारा व आठ-अ उतारा जोडावा.
कोणाला मिळेल लाभ?
जिल्ह्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा संघ यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत. केंद्र शासनाच्या ग्रामीण भांडार योजना व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्जदारांनी प्रथम राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतरच संबंधित अर्जदार कंपनी तालुका कृषी कार्यालयाकडे अर्ज करू शकतील.
रक्कम थेट खात्यात
पूर्व-मंजूर कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर, त्यांना स्वीकार्य अनुदान थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकरी उत्पादक कंपनी, असोसि एशनच्या खात्यात वितरीत केले जाणार आहे.
अर्ज कोठे करायचा?
शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात संपूर्ण दस्तावेजासह अर्ज सादर करावा, असे कळविण्यात आले आहे.
"सदर योजना बँक कर्जाशी संबंधित आहे आणि इच्छुक शेतकरी उत्पादक संघटना, कंपन्यांनी अर्ज सादर करावेत."
- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी