सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:50+5:302021-03-08T04:33:50+5:30

महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्या आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य ...

Build a bridge over the river Sati on the way to Saitola | सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा

सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा

Next

महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्या

आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.

कोरची तालुक्यातील रस्ते दुरूस्त करा

कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत

अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत, तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्याप नवीन इमारती बांधण्यात आलेल्या नाहीत.

नगरपंचायतींना स्वतंत्र इमारतींची प्रतीक्षा

गडचिरोली : नगरपंचायत स्थापन होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, शासनाने नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे जुन्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातूनच शहरांचा कारभार चालवावा लागत आहे. अपुऱ्या जागेमुळे दस्तावेज ठेवण्याची अडचण वाढली आहे.

शहरातील नाल्यांची दुरूस्ती करा

गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरूस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत. शिवाय शहरातील रस्ते अरूंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात.

अंतर्गत रस्ते दुरूस्त करण्याची मागणी

आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांची फार मोठी दुर्दशा झाली आहे. वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे. रस्त्यांची दुरूस्ती करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा निवेदन देऊन मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत रस्ते दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही.

पशुपालनाच्या योजनांची जागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.

शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या

धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले; परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.

शहरातील पक्के अतिक्रमण कायमच

आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गांवर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे. अहेरी शहरातील रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. राजनगरी म्हणून प्रसिध्द असलेल्या शहराच्या अनेक वार्डातील रस्ते उखडले आहेत. अवागमनासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.

समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हवे

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.

भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.

भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.

तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा

सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र, ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकांवर लिहिलेली अक्षरे मिटल्याने अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.

पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी

गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र, या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध नाही. ग्रंथालयाला शासनाकडून तोकडे अनुदान मिळत असल्याने त्यांना ग्रंथखरेदीसाठी अडचण जाते. त्यामुळे पुस्तकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत

देसाईगंज : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीअंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तालुक्याच्या अनेक गावातील जनावरांचे काेंडवाडे अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत.

स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना त्रास

काेरची : तालुक्यातील ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या गावात स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये मृतदेह उघड्यावर जाळण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भेंडाळातील विद्युत उपकेंद्र प्रभारीवर

भेंडाळा : येथील ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत २७ गावात वीजपुरवठा केला जातो. परंतु सध्या या उपकेंद्राचा भार प्रभारी अभियंत्यावर असल्याने वेळीच विद्युत बिघाड दुरुस्ती करण्याच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे येथे स्थायी अभियंता नियुक्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

मार्कंडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोट मार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून, रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना करावा लागत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

बसथांब्यानजीक शौचालय बांधा

चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व मूत्रिघर उभारण्यात यावे, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बँकांअभावी ग्रामीण नागरिकांची अडचण

धानोरा : ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. धानोरा तालुक्यातील नागरिकांना व्यवहार करण्याकरिता तालुका मुख्यालयात यावे लागते. तालुक्यात मुंगनेर, पेंढरी येथे बँकेची गरज आहे. राष्ट्रीयीकृत बँक नसल्याने मुंगनेर, पेंढरी भागातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.

पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

कमाल जमीन धारणेची अट रद्द करा

अहेरी : रोहयोंतर्गत कृषी व सिंचन योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी लाभार्थ्यांना पाच एकराची कमाल जमीन धारणेची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे ओबीसी शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. ही अट हटविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक शेतकऱ्यांकडे पाच एकरांपेक्षा अधिक जमीन असल्याचे दिसून येते.

चामोर्शीतील तलाव सौंदर्यीकरणाच्या प्रतीक्षेत

चामोर्शी : शहरालगत असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. चामोर्शी शहरात फिरण्यासाठी व निवांत बसण्यासाठी प्रशस्त जागा नाही. त्यामुळे शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, अशी मागणी प्रशासनाकडे अनेकदा करण्यात आली. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष झाले.

आशीर्वादनगरात मोकाट डुकरांचा हैदोस

गडचिरोली : गोकुलनगरलगतच्या आशीर्वाद नगरात मोकाट डुकरांचा हैदोस वाढला आहे. रात्रीच्या सुमारास डुकरांच्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत आहे. याशिवाय दुर्गंधी पसरल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा नागरिकांची झोपमोडही होते. त्यामुळे या डुकरांचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

एटापल्ली तालुक्यातील सौरदिवे नादुरुस्तच

एटापल्ली : अतिदुर्गम भागात असलेल्या एटापल्ली तालुक्यातील आदिवासी गावात सौरदिवे लावण्यात आलेत; परंतु अनेक गावांत लावण्यात आलेले सौरदिवे नादुरुस्त अवस्थेत आहेत. सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याने सौरदिवे नाकाम झाले आहेत.

जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई

आलापल्ली : गर्भवती व प्रसुत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमाअंतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही दोन ते अडीच महिने संबंधित मातांना लाभ मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर याबाबत प्रचंड दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे.

ट्रॅक्टरचालकांसाठी परवाना शिबिराची गरज

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरची संख्या वाढली आहे. वाहतूकविषयाचे कुठलेही ज्ञान व नियम आत्मसात नसलेले तरुण ट्रॅक्टर चालवितात. ट्रॅक्टर उलटून जिल्ह्यात पाच ते दहा नागरिकांचा मागील पाच वर्षांत मृत्यू झाला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरधारक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे.

कुरखेडा येथे पार्किंगची व्यवस्था करा

कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने ठेवतात. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यताही वाढली आहे. पार्किंगची व्यवस्था नसल्याने दुकानात येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात.

Web Title: Build a bridge over the river Sati on the way to Saitola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.