सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:23 AM2021-06-30T04:23:49+5:302021-06-30T04:23:49+5:30
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट ...
कुरखेडा : तालुक्यातील अरततोंडी-सायटोला मार्गावरील सती नदीवर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अरततोंडी ते सती नदीघाट हे अंतर जवळपास दोन कि.मी. आहे.
पुलाचे बांधकाम झाल्यास साेयीचे हाेऊ शकते.
महादेवगडाला पर्यटन स्थळाचा दर्जा द्या
आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.
कोरची तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगविले आहे. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरूस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत
अहेरी : अहेरी तालुका मुख्यालयातील अनेक प्रशासकीय इमारती जीर्णावस्थेत आल्या आहेत तरीही याच इमारतींमधून प्रशासकीय कारभार चालविला जात आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारत बांधण्यात आलेल्या नाहीत.
नगरपंचायतींना स्वतंत्र इमारतीची प्रतीक्षा
गडचिरोली : नगरपंचायत स्थापन होऊन दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, शासनाने नगरपंचायतीची इमारत बांधण्यासाठी कोणतीही तरतूद केली नाही. त्यामुळे जुन्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयातूनच शहरांचा कारभार चालवावा लागत आहे. अपुऱ्या जागेमुळे दस्तावेज ठेवण्याची अडचण वाढली आहे.
शहरातील नाल्यांची दुरुस्ती करा
गडचिरोली : शहरात अनेक नाल्यांच्या बाजूला असलेल्या रस्त्यांची वारंवार दुरुस्ती झाल्याने रस्ते उंच आणि नाल्या खाली गेल्या आहेत शिवाय शहरातील रस्ते अरुंद असल्याने अनेक वाहनेही नालीत पडून अपघात होण्याची शक्यता असते. या नाल्यांवर कोणतेच आच्छादन नसल्यानेही किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे शहरातील नाल्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अंतर्गत रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
आरमोरी : शहरातील अंतर्गत रस्त्यांची फार मोठी दुर्दशा झाली आहे. वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गांची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे. रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत नगरपरिषदेकडे स्थानिक नागरिकांनी अनेकवेळा निवेदन देऊन मागणी केली आहे. मात्र, अजूनपर्यंत रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये राेष आहे.
पशुपालनाच्या योजनांची जागृती करा
भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे. त्यामुळे या योजनांची जनजागृती करावी.
शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्या
धानोरा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून काही गावांमध्ये लाख शेतीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले; परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण दिल्यास नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना लाख शेतीचे प्रशिक्षण द्यावे.
शहरातील पक्के अतिक्रमण कायमच
आलापल्ली : शहरातील चारही प्रमुख मार्गांवरील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली. मात्र, या चारही मार्गावर पक्क्या स्वरूपाचे अतिक्रमणही मोठ्या प्रमाणात आहे. अहेरी शहरातील रस्त्यांची पूर्णत: चाळण झाली आहे. राजनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शहराच्या अनेक वाॅर्डालगत रस्ते उखडले आहेत. आवागमनासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
आवश्यक त्या ठिकाणी विद्युत खांब द्या
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
प्रत्येक तालुक्यात समाजकल्याणचे वसतिगृह बांधा
गडचिराेली : जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुला-मुलींचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागते. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
यासाठी जिल्हा प्रशासनाने आराखडा तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात
आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.
वाहतूक शाखेच्या पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्यान सुज्ञ नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखा वेळ देऊ शकत नाहीत.
तुटलेले साईन बोर्ड दुरुस्त करा
सिराेंचा : तालुक्यातील मुख्य मार्गावर बऱ्याच ठिकाणी शहरातील स्थानाबाबत साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. मात्र ते अनेक ठिकाणी तुटले आहेत. त्याची त्वरित दुरुस्ती करावी. अनेक फलकावर लिहिले अक्षरे मिटल्याने अडचण जाते. त्यामुळे गावाचे नाव अंकित करावे, अशी मागणी होत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून साईन बाेर्डांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
पुस्तकसाठा उपलब्ध करण्याची मागणी
गडचिराेली : ग्रामीण भागात शासकीय अनुदानावर ग्रंथालये सुरू आहेत. मात्र या ग्रंथालयात पाहिजे त्या प्रमाणात ग्रंथसाठा उपलब्ध नाही. ग्रंथालयाला शासनाकडून तोकडे अनुदान मिळत असल्याने त्यांना ग्रंथखरेदीसाठी अडचण जाते. त्यामुळे पुस्तकसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी आहे. पुस्तकसाठा उपलब्ध केल्यास विद्यार्थ्यांसाठी साेयीचे हाेईल.
निधीअभावी कोंडवाडे जीर्णावस्थेत
देसाईगंज : मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करतात. अशा जनावरांना कोंडून ठेवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत कोंडवाडे बांधले आहेत. मात्र या कोंडवाड्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. तालुक्याच्या अनेक गावातील जनावरांचे काेंडवाडे अस्वच्छतेच्या गर्तेत सापडले आहेत.
माेकाट जनावरांचा त्रास नागरिकांना हाेत आहे.
स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना त्रास
काेरची : तालुक्यातील ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गावात स्मशानभूमी उभारावी, अशी मागणी केली जात आहे. पावसाळ्यामध्ये मृतदेह उघड्यावर जाळण्याची वेळ गावकऱ्यांवर येत आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.