आलापल्ली येथे बंधाऱ्याचे बांधकाम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:34 AM2021-03-24T04:34:14+5:302021-03-24T04:34:14+5:30
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने ...
आलापल्ली : परिसरातील गावांमध्ये कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी गावातील नागरिकांकडून होत आहे. गावात अल्प हातपंप सुरू असल्याने येथे नव्याने हातपंपही निर्माण करावेत, अशी मागणी आहे. या भागात सिंचन सुविधा ताेकड्या असल्याने याचा परिणाम दाेन्ही हंगामातील विविध पिकांवर हाेत आहे.
नागाेबा देवस्थान दुर्लक्षित
गडचिरोली : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या गोगावपासून दोन किमी अंतरावरील नागोबा देवस्थान व परिसराच्या विकासाकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नागोबा देवस्थानात दरवर्षी रथसप्तमीनिमित्त मोठी जत्रा भरते. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, येथे निवास, पाणी व इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.
भामरागड तालुक्यात लाइनमनची पदे भरा
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाइनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे त्यांना प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.
विश्रामगृहाची मागणी प्रलंबितच
कोरची : कोरची तालुक्याची लोकसंख्या व भौगोलिक विस्तारित क्षेत्राचा विचार करून कोरची येथे शासकीय विश्रामगृह आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून अनेकदा मागणी करण्यात आली. सदर विश्रामगृहाची मागणी अद्याप प्रलंबित आहे. कोरची हे जिल्ह्याचे शेवटचे ठिकाण आहे. या ठिकाणी विश्रामगृह बांधल्यास या ठिकाणी येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी सोयीचे होणार आहे.
पट्टे वाटपासाठी अट शिथिल करा
गडचिरोली : गैरआदिवासी नागरिकांना वनपट्टा देण्यासाठी शासनाने ७५ वर्षांपासून जमिनीवर अतिक्रमण करून असल्याचा दाखला जोडावा लागतो. सदर अट शिथिल करण्याची मागणी आहे. शेकडो दावे तहसीलदारांच्या मार्फत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. मात्र, ७५ वर्षांची अट असल्याने अनेक दावे प्रलंबित आहेत.
पर्यटनस्थळांचा विकास रखडला
कुरखेडा : गडचिरोली जिल्हा हा निसर्गाच्या विविध सौंदर्याने नटलेला आहे. या ठिकाणी अनेक पर्यटनस्थळे आहेत. पण, त्या ठिकाणी अजूनपर्यंत सोयीसुविधा नाहीत. या पर्यटनस्थळांचा विकास केल्यास पर्यटकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनस्थळे असतानाही केवळ शासनाची मान्यता व निधी मिळत नसल्याने त्यांची वाताहत आहे.
याेजनांबाबत जनजागृतीचा अभाव
कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी आहे.
गाळ उपशाअभावी नाल्या तुंबल्या
गडचिरोली : कॉम्प्लेक्स परिसरातील नाल्यांचा उपसा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. कॉम्प्लेक्स परिसर विस्ताराने फार मोठा आहे. त्यामुळे या ठिकाणी जादा मजूर देण्याची मागणी आहे. मागील वर्षीच्या पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी जमा झाले होते. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागला. सध्या नाल्या तुंबल्याने डांसाची पैदास वाढली आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करावा, अशी मागणी हाेत आहे.
यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढले
गडचिरोली : रब्बी हंगामातील हमखास व अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून मक्याला ओळखले जाते. मागील पाच वर्षांत जिल्ह्यात मका लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या अनेक शेतकरी बियाण्यांची खरेदी करून मक्याची लागवड करीत आहेत. मात्र, शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. यावर्षी मका पिकाचे क्षेत्र वाढले असून, आता मका पीक जाेमात आहे. अनेक शेतकरी या पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत.