विद्युत उपकेंद्र निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 10:19 PM2017-11-03T22:19:54+5:302017-11-03T22:20:05+5:30
उपविभागातील दुर्गम भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : उपविभागातील दुर्गम भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. उपविभागातील कमलापूर, जिमलगट्टा, अहेरी, भामरागड येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने ऊर्जामंत्र्यांकडे तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
अहेरी, कमलापूर, जिमलगट्टा परिसरातील अनेक गावांमध्ये विद्युत पुरवठा झालेला नाही. विद्युत पोहोचली असली तरी अनियमित वीज पुरवठा केला जातो. तसेच कमी दाबाचा वीज पुरवठा असतो. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अहेरी, एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, सिरोंचा या दुर्गम भागात मागणीपेक्षा अत्यल्प वीज पुरवठा केल्या जात आहे. त्यामुळे सातत्त्याने वीज पुरवठा खंडित होतो. सर्वसामान्य जनता, शेतकरी, मजूर, कामगार, व्यापारी, विद्यार्थी, कर्मचारी सर्वांनाच विजेच्या लपंडाचा फटका बसतो. कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे घरगुती उपकरणेही नीट काम करीत नाही. अनेकदा उपकरणे निकामी होतात. त्यामुळे अहेरी, कमलापूर, जिमलगट्टा, भामरागड येथे विद्युत उपकेंद्र निर्माण करावे, अशी मागणी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीने केली आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रघुनाथ तलांडे, विलास रापर्तीवार, प्रा. नागसेन मेश्राम, छत्रपती गोवर्धन, योगेश आत्राम व पदाधिकारी उपस्थित होते.