आरमोरी तालुक्यात वसतिगृहांची निर्मिती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:43+5:302021-01-08T05:56:43+5:30
वीज तारानजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये वीज तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने ...
वीज तारानजीकच्या झाडाच्या फांद्या तोडा
चामोर्शी : तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांमध्ये वीज तारांलगत मोठमोठी झाडे आहेत. शिवाय फांद्या वाढल्याने त्या तारांना स्पर्श करीत आहेत. वादळामुळे झाडाच्या फांद्या तारांवर पडल्यास तार तुटून दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे महावितरणने वीज तारालगतच्या झाडांच्या फांद्या तोडाव्यात.
खताच्या ढिगाऱ्यांमुळे शहरात दुर्गंधी
गडचिरोली : तालुक्यासह जिल्ह्याच्या अनेक गावात रस्त्याच्या कडेला शेणखताचे ढिगारे आहेत. त्यामुळे प्रशासनाने नाली स्वच्छतेच्या मोहिमेसोबत शेणखताचे ढिगाऱ्यांची इतरत्र व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अतिक्रमणामुळे सिंचन क्षेत्रात घट
देसाईगंज : तालुक्यातील अनेक मामा तलावांमध्ये सभोवतालच्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून त्यामध्ये धानाच्या बांध्या निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जलपातळीत घट झाली आहे. सदर अतिक्रमण हटविण्याकडे सिंचाई विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे तलावातील सिंचन क्षेत्रही घटत आहे.
धोडराज मार्गाची दुरुस्ती करा
भामरागड : भामरागडवरून धोडराज अंदाजे पाच किमी अंतरावर आहे. या दरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मागील सात वर्षांपासून या मार्गाची दुरुस्तीच करण्यात आली नाही. धोडराज येथील नागरिक दर दिवशी भामरागड येथे शासकीय कामानिमित्त येतात. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे.
आलापल्लीतील थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच
आलापल्ली : आलापल्ली येथे बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा बसविण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलचा इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून सेवा मात्र टू-जी प्रमाणे दिली जात आहे.
दुर्गम भागातील सौरदिवे बंद; गावात अंधार
सिरोंचा : वीज नसलेल्या दुर्गम गावांमध्ये उजेड पाडण्यासाठी प्रशासनाने दोन ते तीन वर्षांपासून शासनाच्या निधीतून सौर पथदिवे लावले. पथदिव्याच्या बॅटऱ्यांमध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यामुळे बहुतांश गावे अंधारातच रात्र काढत आहेत.
गडचिरोली शहरात डुकरांचा हैदोस
गडचिरोली : शहरात डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पचायतीचे दुर्लक्ष होत आहे. दुकानातून खरेदी केलेले साहित्य एखादेवेळेस दुचाकीला अडकवून ठेवल्यास डुकरे त्यांची नासधूस करीत असतात.
फवारणी न झाल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढणार
अहेरी : आरोग्य विभागाच्या वतीने गावागावात फवारणी न झाल्याने यंदा डासांचा प्रादुर्भाव अधिक वाढणार आहे. सध्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. आलापल्ली शहरातही नाल्यांचा उपसा नियमित हाेत नाही.