लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:37 AM2021-07-28T04:37:41+5:302021-07-28T04:37:41+5:30

भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात. ...

Build a new health center in Laheri | लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा

लाहेरीत नवीन आराेग्य केंद्र बांधा

Next

भामरागड : लाहेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पुरेशा इमारतीअभावी एकाच खोलीतून सुरू आहे. अनेक रुग्ण औषधोपचारासाठी दररोज येतात.

नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

गडचिराेली : अनेक गावांमध्ये नाल्या तुंबलेल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी वाहून जाण्यास अडचण जात आहे. डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्य धोक्यात आले आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे त्रास

एटापल्ली : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगरपंचायतीकडे केली आहे.

अनेक भूखंड रिकामे

गडचिरोली : शहराजवळची शेकडो एकर जागा एमआयडीसीसाठी राखीव करण्यात आली आहे. या परिसरात पाणी, वीज यांसारख्या सुविधाही राज्य शासनाच्यावतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, बहुतांश भूखंड रिकामेच असल्याचे दिसून येते.

शाैचालयाचा वापर नाही

आलापल्ली : बहुतांश नागरिकांकडे शौचालय आहे. मात्र, ग्रामीण भागातील नागरिक शौचालयाचा वापरच करीत नाहीत. परिणामी शौचालये बेकामी झाली आहेत. शौचालयाचा वापर न झाल्याने हागणदारीमुक्त गाव निर्माण करणे अडचणीचे झाले.

रस्त्यांची दुरवस्था

जाेगीसाखरा : परिसरातील अनेक गावांना जाेडणाऱ्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बकाल झाली आहे. हे रस्ते दुरुस्त करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वारंवार निवेदने देऊनही रस्ते दुरूस्तीसंदर्भात कार्यवाही नाही.

आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाला.

लघु व्यावसायिक आर्थिक संकटात

चामाेर्शी : शहरात शेकडो लघु व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे यावर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघु व्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडींवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबघाईस आले आहेत.

परवाना शिबिराचे आयोजन करावे

काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठराविक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.

जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी

आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहात असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा

आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या वतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने, अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.

औद्योगिक वसाहती स्थापन करा

गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. याठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सुटीवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा

गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे.

वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण

गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.

ग्रामीण भागात विजेचा लपंडाव

देसाईगंज : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच देसाईगंज तालुक्यातील अनेक विद्युत तारा लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषी पंपधारक शेतकरी रब्बी पिकाची तयारी करीत आहे. अशा वेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे महावितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित

आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, कोंडवाड्यांची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यांमध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे.

निराधार प्रकरणांचा निपटारा करावा

चामाेर्शी : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांंची प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. काेराेना संचारबंदीमुळे कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थिती असल्याने विलंब हाेत आहे.

योजनांच्या माहितीसाठी केंद्र निर्माण करा

कुरखेडा : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांच्या माहितीअभावी नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. त्यामुळे तालुकास्तरावर कायमस्वरूपी जनसंपर्क कार्यालयाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.

कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

गडचिरोली : कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी.

आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम थंडावले

गडचिरोली : गडचिरोली येथे आकाशवाणी केंद्र उभारण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचनेनंतर केंद्र सरकारने घेतला होता. मात्र, आकाशवाणी केंद्र निर्मितीचे काम अद्याप थंडबस्त्यात आहे. शासनाचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

गडचिरोली - पेंढरी मार्गावर बसफेऱ्या अत्यल्प

धानोरा : गडचिरोली आगारातून पेंढरी मार्गावर बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात, अशी मागणी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांकडून केली जात आहे. गडचिरोलीवरून एटापल्ली - अहेरीकडे जाण्यासाठी गडचिरोली - कारवाफा - पेंढरी हा प्रमुख मार्ग आहे.

गरोदर मातांना बुडीत मजुरी देण्याची मागणी

सिरोंचा : गरोदर मातांना शासनाकडून बुडीत मजुरी दिली जाते. मात्र, जिल्ह्यातील मातांना ही मजुरी देण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे. महिला रुग्णालयात चकरा मारत आहेत. ही मजुरी तत्काळ देण्याची मागणी होत आहे. काही महिलांना एक ते दीड वर्षापासून बुडीत मजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे महिला अद्याप वंचित आहेत.

शहरातील अनेक वॉर्डात सट्टापट्टी जोमात

गडचिरोली : शहरात सट्टापट्टी जोमात सुरू आहे. अनेक युवक सट्टापट्टीच्या नादाला लागले आहेत. शहरात शेकडो एजंट सट्टापट्टीची वसुली करीत आहेत. मात्र, याकडे गडचिरोली पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते. त्यामुळे सट्टापट्टीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक विद्यार्थी व युवक या व्यवसायात गुंतले असल्याचे दिसून येत आहे.

घर बांधकामाचा खर्च दुपटीने वाढला

गडचिरोली : दोन वर्षांपासून सळी, सिमेंट, रेती, विटा, गिट्टी व इतर बांधकाम साहित्यांचे भाव प्रचंड वधारले आहेत. याशिवाय मेस्त्री व मजुरीच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता घर व इमारत बांधकामाचा खर्च दुपटीवर वाढला आहे.

पशु योजनांबाबत जनजागृती करा

भामरागड : पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र, बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे. पशुपालन हा शेतीला चांगला जोडधंदा आहे.

मूल मार्गावरील बसफेऱ्या वाढवा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील अनेक नागरिक मूल, चंद्रपूरला ये-जा करतात. त्यामुळे या मार्गावरून नेहमीच प्रवाशांची वर्दळ राहाते. त्या तुलनेत बसफेऱ्या कमी आहेत. परिणामी नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आता अनलाॅक झाल्यापासून वर्दळ वाढली आहे. परिणामी प्रवाशांची संख्या वाढल्याने बसफेऱ्यांची गरज आहे.

अर्धवट पुलावरून खडतर प्रवास

धानोरा : तालुक्यातील राजोली गावाजवळच्या कठाणी नदीवर पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल मुसळधार पावसामुळे रपट्यासह वाहून गेला. या भागातील विद्यार्थी व नागरिकांना पुलाअभावी नवरगावमार्गे अधिकचे १५ किमी अंतर कापावे लागते.

Web Title: Build a new health center in Laheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.