खैरी रिठाकडे जाण्यासाठी रस्ता बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:49+5:302021-07-04T04:24:49+5:30

गडचिराेली : तालुक्यातील चांभार्डा, मरेगाव, टेंभा येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी खैरी रिठावर आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी पक्का ...

Build a road to Khairi Rita | खैरी रिठाकडे जाण्यासाठी रस्ता बांधा

खैरी रिठाकडे जाण्यासाठी रस्ता बांधा

Next

गडचिराेली : तालुक्यातील चांभार्डा, मरेगाव, टेंभा येथील बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी खैरी रिठावर आहेत. परंतु येथील शेतकऱ्यांना शेतावर जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. दरवर्षी शेतकरी चिखल तुडवत येथून ये-जा करतात. त्यामुळे खैरी रिठाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता निर्माण करावा. याकरिता सुरुवातीला मातीकाम करून रस्त्याची निर्मिती करावी. त्यानंतर येथे खडीकरण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कचऱ्यावर प्रक्रिया करा

अहेरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा.

ताेट्यांअभावी पाणी वाया

गडचिरोली : शहरातील बहुतांश नळांना नागरिकांनी तोट्या लावल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील अनेक वॉर्डांतील नागरिकांच्या घरातील नळाच्या तोट्या निकामी झाल्या आहेत. नगर परिषदेने नळधारकांची तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामीण भागात रॉकेल मिळण्यास अडचण

आलापल्ली : जिल्ह्यात अवैधरित्या रॉकेलची सर्रास विक्री होत असली तरी ग्रामीण भागात अनेक नागरिकांना राॅकेल मिळत नसल्याचे दिसून येेते. अनेक रॉकेल दुकानदार गैरमार्गाने रॉकेल विकत आहेत. त्यामुळे पुरवठा विभागाने संबंधितांवर कारवाई करावी.

बीपीएल उत्पन्न मर्यादेची क्षमता वाढवा

आलापल्ली : बीपीएलचा लाभ २० हजार उत्पन्न मर्यादा असलेल्या नागरिकांना दिला जात आहे. परंतु नागरिकांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ झाली असल्याने बीपीएल यादीची उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.

कठडे लावण्यास दिरंगाई

चामोर्शी : अनेक पुलांवर अद्यापही कठडे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता आहे. या मार्गावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच सध्या रस्त्याचे काम सुरू आहे. कठडे नसल्याने अपघात होऊन मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माेकाट श्वानांमुळे धाेका

कमलापूर : दिवसेंदिवस शहरात मोकाट श्वानांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी नगर पंचायतीची आहे. स्थानिक नागरिकांनी यांचा बंदोेबस्त करावा, अशी मागणी अनेकवेळा नगर पंचायतीकडे केली आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्षच होत आहे.

एटापल्लीत अतिक्रमण

एटापल्ली : शहरातील रस्त्यालगत तसेच मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे लक्ष दिले जात नाही.

खुटगावचा प्रवासी निवारा जीर्ण

धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवारा शेडच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या त्याची दुरवस्था झाली आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून हाेत आहे.

शिधापत्रिका अद्ययावत करा

सिरोंचा : सार्वजनिक वितरणप्रणाली अद्ययावत करण्यासाठी राज्यात शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. जिल्ह्यात हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. शिधापत्रिकेवर नाव नाेंदणी हाेऊनही तीन ते चार महिन्यांपर्यंत संगणकीकरण हाेत नसल्याने लाभ मिळत नाही.

पथदिव्यांअभावी अंधार

गडचिरोली : खरपुंडी मार्गावर डम्पिंग यार्डपर्यंत वीज तारा टाकून खांब गाडण्यात आले आहेत. मात्र, या मार्गावर अजूनपर्यंत पथदिवे लावण्यात आले नाहीत. सकाळी अनेक नागरिक फिरण्यासाठी खरपुंडी मार्गावर जातात. या मार्गावर पथदिवे लावण्याची मागणी होत आहे. परंतु या मागणीकडे पालिकेचे दुर्लक्ष आहे.

मुख्यालय सक्तीचे करा

अहेरी : उपविभागातील तसेच आरमोरी, देसाईगंज, आरमोरी, कोरची व कुरखेडा तालुक्यांच्या दुर्गम भागात कार्यरत कर्मचारी दररोज अपडाऊन करीत आहेत. हे कर्मचारी दुर्गम भागात राहातच नसल्यामुळे ते कार्यालयात नियमित हजर राहात नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील कार्यालये ओस पडत आहेत.

Web Title: Build a road to Khairi Rita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.