स्वच्छतागृहे उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:50+5:302021-01-23T04:37:50+5:30

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. ...

Build toilets | स्वच्छतागृहे उभारा

स्वच्छतागृहे उभारा

Next

गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौक शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी इंदिरा गांधी चौकातूनच मार्गक्रमण करावे लागते. अनेक नागरिक चौक परिसरात विसावा घेतात. नागरिकांना मुतारीसाठी जागा नाही. काही नागरिक इंदिरा गांधी चौकात असलेल्या सभागृहात लघुशंका करतात. त्यामुळे दुर्गंधी आहे.

कमलापुरात भ्रमणध्वनी सेवा कुचकामी

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर परिसरात शासनातर्फे भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा सुरू करण्यात आली. करोडो रुपये खर्च करून रेपनपल्ली येथे बीएसएनएल भ्रमणध्वनी सेवेचा मनोरा उभारण्यात आला. मात्र, सदर टॉवर रेंज राहत नसल्याने भ्रमणध्वनी सेवा कुचकामी ठरली आहे. परिणामी जनता त्रस्त झाली आहे.

भरधाव वाहनांवर कारवाई करा

आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

कचऱ्याच्या ढिगांमुळे स्वच्छतेची ऐशीतैशी

अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्याच्या अगदी बाजूला कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे स्वच्छतेची वाट लागत असल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे विविध योजना तसेच स्पर्धा आयोजित करून गावांमध्ये स्वच्छता राहील, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गावकरी गावात स्वच्छता ठेवत आहेत. ग्रामीण भागात तीन नागरिकांकडे पाळीव जनावरे आहेत. या जनावरांचे मलमूत्र टाकण्यासाठी अनेक शेतकऱ्यांकडे जागा नसल्याने सदर मलमूत्र रस्त्याच्या कडेला टाकले जात आहे.

सिरोंचा शहरात डुकरांचा हैदोस

सिरोंचा : तालुका मुख्यालयी डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाणसुद्धा प्रचंड प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

कुंपणाअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान

गडचिरोली : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. तारेचे कुंपण महाग असल्याने नागरिक तार खरेदी करू शकत नाहीत.

भेंडाळा बसस्थानकावर गतिरोधक उभारा

चामोर्शी : मूल-चामोर्शी मार्गावर असलेल्या भेंडाळा येथील बसस्थानकावर गतिरोधक उभारण्यात यावे, अशी मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. चामोर्शी-मूलमार्गे तसेच आष्टीकडे जाणारी शेकडो वाहने भरधाव वेगाने जातात. गतिराेधक निर्माण केल्यास वेगाने धावणाऱ्या वाहनावर आळा बसण्यास साेयीस्कर हाेणार आहे.

गंजलेल्या विद्युत खांबाने अपघाताचा धोका

आलापल्ली : येथील काही वॉर्डांत रस्त्यालगत विद्युत खांब गंजले आहेत. सदर खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब बदलण्याची मागणी होत आहे. जिल्हाभरात अशा प्रकारचे गंजलेले शेकडो खांब आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, या समस्येकडे कायम दुर्लक्ष आहे.

आलापल्ली मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य

आष्टी : येथील आलापल्ली मार्गावर पेट्राेल पंपाच्या पुढे रस्त्याच्या कडेला माेठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य आहे. दुकानदार येथे कचरा टाकत असल्यामुळे डम्पिंग यार्ड बनले आहे.

गाेकुलनगर रस्त्यांची दुरुस्ती करा

गडचिरोली : शहरातील गाेकुलनगर रस्त्यांची नगरपरिषदेने दुरुस्ती केली नाही. त्यामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहे. खड्ड्यांबरोबरच या परिसरातील नाल्यांचाही नियमितपणे उपसा केला जात नाही. परिणामी या ठिकाणच्या नाल्या तुडुंब आहेत.

आवश्यकतेच्या ठिकाणी विद्युत खांब द्या

धानोरा : तालुक्यातील चव्हेला, मुंगनेर येथे वाढीव विद्युत खांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागात रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरते.

ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीजचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने वीज महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, वीज चोरीचा भुर्दंड इतर नागरिकांना सहन करावा लागत आहे.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज

धानोरा : वनविभागामार्फत संयुक्त वनव्यवस्थापनाचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहे. मात्र, गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी द्यावी.

सौरदिव्यांसाठी नव्याने बॅटऱ्या उपलब्ध करा

आष्टी : विद्युत वाचविण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतींनी सौरदिवे लावले आहेत. मात्र, यातील बहुतांश सौरदिव्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे सौरदिवे केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. त्यामुळे नव्याने बॅटऱ्या द्याव्यात, अशी मागणी आहे.

वनहक्क पट्ट्यापासून नागरिक वंचित

कोरची : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे.

मोकाट जनावरांमुळे रहदारी बाधित

आष्टी : शहरातील मुख्य मार्गांवर मोकाट जनावरे मधोमध उभे राहतात. त्यामुळे रहदारी बाधित होत असून, वाहनधारकांना नेहमी अपघाताची भीती असते.

Web Title: Build toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.