विम्याबाबत इमारत बांधकाम कामगारच आहेत अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:35+5:30
बांधकाम कामगारांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आराेग्यविषयक व आर्थिक बाबतीत विविध याेजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तेव्हाच मजुरांना संबंधित याेजनेचा लाभ दिला जाताे. परंतु केवळ नाेंदणी केल्यानंतर केवळ साहित्याचा लाभ मजूर घेतात. त्यानंतर काेणत्याच याेजनेचा लाभ ते घेत नाहीत.
गोपाल लाजुरकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी विविध याेजना राबविल्या जात आहेत. यामध्ये कामाच्यास्थळी अपघाती मृत्यूनंतर पाच लाख तर नैसर्गिंक मृत्यूनंतर दाेन लाख रुपये लाभ दिला जाताे. परंतु याबाबत इमारत व इतर बांधकाम कामगार अनभिज्ञ आहेत.
बांधकाम कामगारांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आराेग्यविषयक व आर्थिक बाबतीत विविध याेजना आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट नमुन्यातील अर्ज व कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तेव्हाच मजुरांना संबंधित याेजनेचा लाभ दिला जाताे. परंतु केवळ नाेंदणी केल्यानंतर केवळ साहित्याचा लाभ मजूर घेतात. त्यानंतर काेणत्याच याेजनेचा लाभ ते घेत नाहीत.
ह्या आहेत आराेग्यविषयक याेजना
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे कामगारांसाठी विविध आराेग्यविषयक याेजना राबविल्या जात आहेत. मजुराच्या पत्नीच्या नैसर्गिक प्रसुतीनंतर १५ हजार, शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीनंतर २० हजार, गंभीर आजाराच्या उपचारासाठी कामगार व त्याच्या कुटुंबाला १ लाखापर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियाेजन केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षांपर्यंत १ लाख मुदत बंद ठेव याेजनेचा लाभ दिला जाताे.
याेजना आहे, हेच ठाऊक नाही !
कल्याणकारी मंडळातर्फे काेणत्या याेजना राबविल्या जातात. याबाबत आपल्याला काहीच माहिती नाही. आम्ही केवळ सेतू केंद्रामार्फत नाेंदणी केली. त्यानंतर काही दिवसात अर्ज मंजूर झाला व जिल्हा कार्यालयात कागदपत्रे सादर केली. एक ते दाेन दिवसांत आम्हांला कामगाराच्या साहित्याची पेटी मिळाली. केवळ हाच लाभ मिळाला. माहितीअभावी अन्य काेणत्याही याेजनांचा लाभ घेतला नाही. त्याबाबत माहितीही मिळत नाही.
- विकास मडावी, कामगार
कामगारांसाठी विविध याेजना आहेत. हे माहीत आहे. परंतु त्या याेजनांचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागते. वारंवार शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे याेजना असूनही माझ्यासह अनेक कामगार लाभ घेत नाहीत. भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक गरज भासल्यास याेजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करू. परंतु सध्या काेणत्याच याेजनांचा लाभ घेण्याची मानसिकता नाही.
- प्रशांत आत्राम, कामगार
२८,००० अर्ज
- गडचिराेली जिल्ह्यात इमारत बांधकामावरील मजुरांनी कामगार कल्याण मंडळाअंतर्गत नाेंदणी केली आहे. जिल्ह्यात ही संख्या २८ हजारांवर आहे.
- जिल्ह्यात कामाच्या स्थळी अपघातानंतर मृत्यू अथवा नैसर्गिक मृत्यूनंतर एकाही कामगाराचा प्रस्ताव लाभासाठी जिल्हा कार्यालयाकडे आलेला नाही. ही संख्या निरंक आहे. विशेष म्हणजे कामगारांमध्ये याबाबत जागृती नसल्यानेच प्रस्ताव आला नसल्याचे दिसून येते.