रेगडी आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 12:55 AM2017-12-15T00:55:28+5:302017-12-15T00:56:28+5:30
परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोट : परिसरातील रेगडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली आहे. ऊन, पावसापासून बचावासाठी या इमारतीवर चक्क ताडपत्री टाकण्यात आली आहे. नवीन इमारतीअभावी जीर्ण इमारतीमध्ये जीव धोक्यात घालून रुग्णांना आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे.
घोट परिसरात चार पंचायत समिती क्षेत्र येतात. या परिसरात एकूण १९ गावे असून या गावांची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मात्र या परिसरात घोट, अडपल्ली व रेगडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या परिसरात अपघात झाल्यास २० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात रूग्णाला भरती करावे लागते. या प्रवासादरम्यान रूग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. घोट हे या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय निर्माण करावे, अशी मागणी मागील २० वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नवजात शिशु व महिलांसाठी तज्ञ डॉक्टर नाही. घोट येथे १० बेडची सुविधा असलेली इमारत आहे. परंतु सदर इमारत पावसाळ्यात गळते. त्यामुळे रूग्ण व कर्मचाºयांची हेळसांड होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी जमा होते. त्यामुळे घोट व रेगडी येथील इमारतींची दुरूस्ती करावी, घोट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करावे, अशी मागणी सिमुलतला ग्रामपंचायतीचे सरपंच सजल बिश्वास, शामल मंडल, पंचायत समितीच्या उपसभापती आकुली बिश्वास, साईनाथ नेवारे, सुगाबाई आत्राम, विलास उईके, उर्मिला पोगुलवार, शालिनी ठाकूर यांनी केली आहे. याबाबत जि.प. सदस्य नामदेव सोनटक्के यांना विचारणा केली असता, शासनाकडे पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली. या समस्यांबाबत जिल्हा परिषदेकडे पत्रव्यवहार केला आहे. विकासपल्ली व वेंगनूर येथे उपकेंद्र प्रस्तावित असल्याची माहिती डॉ.उमाकांत मेश्राम यांनी दिली.
घोट येथे ग्रामीण रूगणालयाची मागणी
घोट परिसरात एकूण १९ गावे आहेत. या गावांची लोकसंख्या २५ हजारांच्या जवळपास आहे. मात्र या परिसरात ग्रामीण रूग्णालय नाही. त्यामुळे गंभीर स्थितीतील रूग्णाला चामोर्शी किंवा मुलचेरा येथील ग्रामीण रूग्णालयात हलविल्याशिवाय पर्याय राहत नाही. चामोर्शी तालुक्यातील टोकावर असलेल्या काही गावांचे अंतर चामोर्शीपासून ४० ते ५० किमी आहे. एवढे अंतर पार करून रूग्णालयात रूग्णाला दाखल करेपर्यंत रूग्ण दगावण्याची शकयता राहते. घोट हे मध्यवर्ती गाव असल्याने या ठिकाणी ग्रामीण रूग्णालय स्थापन करावे, अशी मागणी होत आहे.