आरोग्य केंद्र इमारतीचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:06 PM2018-05-28T23:06:41+5:302018-05-28T23:06:41+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम मंजूर केल्यानंतर हे काम जागेअभावी दोन वर्ष रखडले होते. मात्र एक हेक्टर जागा उपलब्ध झाली असून या जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू आहे. सदर कामाने गेल्या दोन महिन्यांपासून वेग घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लखमापूर बोरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत चामोर्शी तालुक्याच्या लखमापूर बोरी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम मंजूर केल्यानंतर हे काम जागेअभावी दोन वर्ष रखडले होते. मात्र एक हेक्टर जागा उपलब्ध झाली असून या जागेवर आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू आहे. सदर कामाने गेल्या दोन महिन्यांपासून वेग घेतला आहे.
लखमापूर बोरी येथे १५ वर्षांपूर्वी अॅलोपॅथिक दवाखान्याची निर्मिती करण्यात आली. यासाठी दोन मोठे इमारती व निवासस्थान उभारण्यात आले. सदर दवाखाना तीन वर्ष चालल्यानंतर अल्पावधीतच बंद पडला. त्यामुळे या परिसरात पुन्हा आरोग्य सेवेचा प्रश्न निर्माण झाला. गेल्या २० वर्षांपासून लखमापूर बोरी परिसरात प्रभावी आरोग्य सेवा नसल्याने येथे प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करावे, अशी मागणी जोर धरू लागली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकाºयांच्या पुढाकारातून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले. जागेअभावी दोन वर्ष पीएचसी इमारतीचे काम रखडले. त्यानंतर येथील जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळेच्या मालकीची एक हेक्टर जागा बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्या हस्ते बांधकामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला.
चंद्रपूर येथील खासगी कंत्राटदारामार्फत आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम सुरू असून कॉलमचे काम पूर्ण झाले असून पुढील काम सुरू आहे. या कामाच्या माध्यमातून मजुरांना रोजगारही मिळाला आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण होणार असून त्यानंतर या भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.
सदर प्राथमिक आरोग्य केंद्रात कामकाज चालविण्यासाठी वैद्यकीय अधिकाºयांसह एकूण १५ आरोग्य कर्मचाºयांची आवश्यकता आहे. सदर पदे शासनाने मंजूर करावी, यासाठी या भागातील लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे.