अनधिकृत बांधकामांवर बुलडाेझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 05:00 AM2021-02-12T05:00:00+5:302021-02-12T05:00:32+5:30

अतिक्रमणामुळे मुख्य मार्गावर रहदारीसह अडथळा निर्माण झाल्याची ओरड हाेत होती. या बाबीची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके  यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पाेहाेचून गुरुवारला शहरातील नैनपूर रोडवरील कापड दुकानाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. याशिवाय विनापरवाना लागलेले दोन मोबाईल टाॅवर सील केले. 

Bulldozers on unauthorized constructions | अनधिकृत बांधकामांवर बुलडाेझर

अनधिकृत बांधकामांवर बुलडाेझर

Next
ठळक मुद्देदाेन टाॅवर केले सील : देसाईगंज पालिकेची अतिक्रमणावर धडक कारवाई

लाेकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : मागील अनेक वर्षांपासून शहराच्या विविध भागासह मुख्य मार्गांवर अतिक्रमण करून केलेल्या अनधिकृत बांधकामावर गुरुवारी (दि.११) नगर परिषद प्रशासनाने बुलडोझर चालवला. या कारवाईबद्दल सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
अतिक्रमणामुळे मुख्य मार्गावर रहदारीसह अडथळा निर्माण झाल्याची ओरड हाेत होती. या बाबीची दखल घेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके  यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह पाेहाेचून गुरुवारला शहरातील नैनपूर रोडवरील कापड दुकानाच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर चालवून अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. याशिवाय विनापरवाना लागलेले दोन मोबाईल टाॅवर सील केले. 
देसाईगंज येथील नैनपूर रोडस्थित नझुल खसरा क्रमांक २२ मधील प्लॉट क्र २८ व नझुल खसरा क्रमांक २२ मधील प्लॉट क्रमांक २३/१० व माता वाॅर्डातील मालमत्ता क्रमांक ६४ मधील जय अम्बे कापड बाजाराची इमारत बांधकाम पाडण्यात आले. परवानगीपेक्षा अनधिकृत अधिकचे बांधकाम केल्याने  इमारतीवर बुलडाेझर चालविण्यात आला. तसेच विनापरवाना इन्डस कंपनीचा टॉवरचा विद्युत पुरवठा खंडित करून इमारत सील करण्यात आली.  सदर अनधिकृत बांधकामामुळे या मार्गांवरून आवागमन करण्यासह वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान, अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यासंदर्भात वारंवार नगर परिषदेतर्फे नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढता अधिकचे अनधिकृत बांधकाम करण्यासह तीन मजली इमारत उभी केली. 
दरम्यान, सदर इमारतीचे बांधकामच अनधिकृत असताना वरच्या मजल्यावर नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता दोन मोबाईल टाॅवर उभारले.  नोटीस बजावूनही अतिक्रमण काढण्यात न आल्याने नगर परिषदेचे मुख्याधिकारी  डाॅ. कुलभूषण रामटेके यांच्या नेतृत्वात सदर अतिक्रमण काढण्यासह दोन टाॅवर व संपूर्ण दुकानास सील ठोकण्यात आल्याने शहरातील अतिक्रमणधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. इतरही ठिकाणच्या अतिक्रमणावर अशीच कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.  प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
 

मुख्य मार्गावरील अतिक्रमण कायमच
शहरात अनेक इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. सदर बांधकाम पाडण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असताना, मागील अनेक वर्षांपासून देसाईगंज नगर परिषदेने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही.  बाजारपेठेतील मुख्य मार्गावर अतिक्रमण करून अर्धेअधिक रस्ते गिळंकृत करूनही अशा दुकानदारांवर कोणतीच कारवाई केली नाही. बाजारपेठेच्या मुख्य मार्गांवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 
मुख्य मार्गावर सोमवारपासून कारवाई
शहराच्या मुख्य मार्गावरील अनधिकृत बांधकाम हटविण्याची येत्या सोमवारपासुन धडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाॅ. कुलभूषण रामटेके यांनी दिली.

 

Web Title: Bulldozers on unauthorized constructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.